नागझरीच्या योजनांना संगीता साळुंखे यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:12 AM2021-03-04T05:12:49+5:302021-03-04T05:12:49+5:30
कऱ्हाड : नागझरी गावाच्या विविध योजनांना माई चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा संगीता साळुंखे यांनी भेट दिली. तेथील क्लोरिन पाणी शुद्धीकरण ...
कऱ्हाड : नागझरी गावाच्या विविध योजनांना माई चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा संगीता साळुंखे यांनी भेट दिली. तेथील क्लोरिन पाणी शुद्धीकरण प्रकल्प, प्राथमिक डिजिटल व सोलर शाळा, अंतर्गत पेव्हर्स, सिमेंट व जाळी बंधारे, पाझर तलाव आणि जलसंधारणाच्या कामांची पाहणी करून त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी किवळचे माजी उपसरपंच सुनील साळुंखे, ग्रामपंचायत सदस्य रामराव साळुंखे, खोडजाईवाडीचे सरपंच बजरंग कोकाटे, संभाजी मांडवे उपस्थित होते.
नेचलच्या सरपंचपदी रामभाऊ मोहिते
कोयनानगर : नेचल (ता. पाटण) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रामभाऊ मोहिते, तर उपसरपंचपदी बंडू कदम यांची निवड झाली. ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीने सत्तांतर घडवून सत्ता ताब्यात घेतली आहे. नेचल ही विभागातील महत्त्वाची ग्रामपंचायत आहे. तेथे शिवसेनेच्या अनेक वर्षांच्या सत्तेला राष्ट्रवादीने या निवडणुकीत सुरुंग लावला. यंदा प्रथमच या ठिकाणी सत्तांतर झाले. राष्ट्रवादीचे चार सदस्य निवडून आले आहेत. विरोधी शिवसेनेला तीन जागा मिळाल्या. या विजयात महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या रामभाऊ मोहिते यांना सरपंचपदी, तर बंडू कदम यांना उपसरपंचपदी निवडण्यात आले.
कामरगावच्या सरपंचपदी हेमंत चाळके यांची निवड
कोयनानगर : कामरगाव (ता. पाटण) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवसेनेचे हेमंत चाळके, तर उपसरपंचपदी राष्ट्रवादीचे शिवाजी सपकाळ यांची बिनविरोध निवड झाली. ग्रामपंचायत महाविकास आघाडीच्या ताब्यात आहे. निवडणुकीत कामरगाव गावात महाविकास आघाडी स्थापन झाल्याने ग्रामपंचायत बिनविरोध झाली. शिवसेनेच्या चार, तर राष्ट्रवादीच्या पाच सदस्यांची निवड करण्यात आली. ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षाचा पहिला सरपंच, असे या ठिकाणी ठरले होते. त्यानुसार शिवसेनेच्या चाळके यांची सरपंचपदी वर्णी लागली; तर उपसरपंचपदी राष्ट्रवादीच्या शिवाजी सपकाळ यांची निवड करण्यात आली.
खोडशीच्या सरपंचपदी महेश काटकर बिनविरोध
कऱ्हाड : खोडशी (ता. कऱ्हाड) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी महेश काटकर, तर उपसरपंचपदी सिंधुताई सावंत यांची बिनविरोध निवड झाली. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व ‘सह्याद्री’चे संचालक पांडुरंग चव्हाण, माजी सरपंच श्रीकांत पाटील, राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली येथील ग्रामविकास सहकार पॅनलने अकरापैकी आठ जागांवर विजय मिळवून ग्रामपंचायतीत सत्तांतर घडविले होते. निवडीवेळी संभाजी भोसले, विश्वनाथ दाभाडे, युनूस सुतार, कविता जाधव, शीतल भोसले, ज्योत्स्ना लोंढे, आदी उपस्थित होते. नूतन सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, दाजी भाऊसाहेब पाटील, स्वप्निल जाधव, संजय कदम, संजय पाटील, बाळासाहेब पाटील, बाळासाहेब भोसले, बाळासाहेब शिंदे, सुभाष पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.