कराडात ऊस दरासाठी संघर्ष समितीची पायी दिंडी, यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतिस्थळाला घातलं साकडे

By प्रमोद सुकरे | Published: November 14, 2022 04:24 PM2022-11-14T16:24:18+5:302022-11-14T16:26:03+5:30

'ऊसाला ३५०० रुपये दर मिळालाच पाहिजे. शेतकरी एकजुटीचा विजय असो' अशा प्रकारच्या घोषणा देऊन शेतकऱ्यांनी संपूर्ण परिसर दुमदुमून सोडला.

Sangharsh Samiti payi dindi for sugarcane rates in karad | कराडात ऊस दरासाठी संघर्ष समितीची पायी दिंडी, यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतिस्थळाला घातलं साकडे

कराडात ऊस दरासाठी संघर्ष समितीची पायी दिंडी, यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतिस्थळाला घातलं साकडे

googlenewsNext

कराड : उसाला ३५०० रुपये भाव मिळाला पाहिजे; यासाठी सातारा जिल्ह्यातील शेतकरी संघटना एकवटल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून सोमवारी कराडात ऊस दर संघर्ष समिती च्या वतीने कोपर्डे ते कराड ६ किलोमीटर पायी दिंडी काढण्यात आली. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करून साखर कारखानदारांना सुबुद्धी द्यावी असे साकडे घालण्यात आले.

सोमवारी सकाळी कोपर्डै हवेली (ता. कराड) येथील सिद्धेश्वर मंदिरात दर्शन घेत शेतकरी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी टाळ मृदंगाच्या गजरात पायी दिंडीला सुरुवात केली. या दिंडीचे बनवडी फाटा, सैदापूर, गोवारे मंगळवारपेठ या ठिकाणी शेतकऱ्यांनी जंगी स्वागत केले. त्यानंतर ही दिंडी दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळावर पोहोचली. तेथे समाधीला ऊस व फुले अर्पण करून अभिवादन करण्यात आले.  साखर सम्राटांना सुबुद्धी द्यावी असे साकडे यावेळी घालण्यात आले.

यावेळी रयत क्रांती संघटनेचे प्रमुख, माजी मंत्री सदाभाऊ खोत, प्रदेशाध्यक्ष सचिन नलावडे, बळीराजा शेतकरी संघटनेचे पंजाबराव पाटील, विश्वास जाधव, बैलगाडा शर्यत संघटनेचे धनाजी शिंदे ,अपंग प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल कारंडे , शिवाजी पाटील, शिवाजी डुबल,, रवी पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.

सातारा जिल्ह्यामधील कारखान्यांनी उसाची पहिली उचल ३५०० रुपये द्यावी यासाठी कोपर्डी हवेली येथे पहिली ऊस परिषद पार पडली होती. त्यावेळी ऊस परिषदेमध्ये आंदोलनाचे टप्पे शेतकऱ्यांनी ठरवले होते. त्यानुसार सोमवारी दि.१४ रोजी कोपर्डे हवेली येथील सिद्धनाथ देवाचे दर्शन घेऊन बनवडी फाटा, कृष्णा कॅनॉल, मंगळवार पेठ कराड ते यशवंतराव चव्हाण  समाधीस्थळ प्रीतीसंगम अशी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पायी दिंडी झाली.

यावेळी शेतकऱ्यांनी 'ऊसाला ३५०० रुपये दर मिळालाच पाहिजे. शेतकरी एकजुटीचा विजय असो' अशा प्रकारच्या घोषणा देऊन संपूर्ण परिसर दुमदुमून सोडला.

सदाभाऊ खोत म्हणाले, दोन साखर कारखान्यामधील २५ किलोमीटरचे अंतर ही अट आता रद्द केली पाहिजे. साखर कारखानदारांची मक्तेदारी मोडीत काढली पाहिजे. जागोजागी साखर कारखाने सुरू झाल्याशिवाय शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळणार नाही. त्याचबरोबर सहकारी साखर कारखानदारच खाजगी साखर कारखाने उभारत असून त्या माध्यमातून शेतकऱ्यांची लूट करीत आहेत असे मत व्यक्त केले.

Web Title: Sangharsh Samiti payi dindi for sugarcane rates in karad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.