सातारा : राज्यमार्गावरील अतिक्रमणामुळे बाजारपेठेवर परिणाम, मायणीत वाहतुकीच्या कोंडीची समस्या : कातरखटावकरांचा आदर्श घेण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 03:19 PM2018-01-15T15:19:32+5:302018-01-15T15:26:49+5:30
मायणी गावातून सुमारे एक किलोमीटर मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्ग जात असून, या मार्गाच्या दोन्ही बाजूस मुख्य बाजारपेठ, प्रशासकीय कार्यालय, बँका, बसस्थानक व शाळा आदी महत्त्वपूर्ण ठिकाणे आहेत. तसेच दोन्ही बाजूस रहिवासी घरे असल्यामुळे या मार्गावर सतत वाहतुकीची कोंडी होत असल्याने वाहतुकीवर व बाजारपेठेवर परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळे मायणीकर कातरखटावकरांचा अतिक्रमण काढण्याचा आदर्श घेणार का ? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
मायणी : मायणी गावातून सुमारे एक किलोमीटर मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्ग जात असून, या मार्गाच्या दोन्ही बाजूस मुख्य बाजारपेठ, प्रशासकीय कार्यालय, बँका, बसस्थानक व शाळा आदी महत्त्वपूर्ण ठिकाणे आहेत. तसेच दोन्ही बाजूस रहिवासी घरे असल्यामुळे या मार्गावर सतत वाहतुकीची कोंडी होत असल्याने वाहतुकीवर व बाजारपेठेवर परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळे मायणीकर कातरखटावकरांचा अतिक्रमण काढण्याचा आदर्श घेणार का ? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
शैक्षणिक, पर्यटन, धार्मिक व खटाव तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील गाव अशी ओळख असलेल्या या गावात परिसरातील चितळी, कलेढोण, पाचवड, पडळ, धोंडेवाडी, निमसोड व सांगली जिल्ह्यातील माहुली व भिकवडी गावातील व परिसरातील वाड्या वस्त्यातील हजारो ग्रामस्थ रोज व्यापारासाठी व शासकीय कामासाठी येत असतात. प्राथमिक, माध्यमिक, इंग्लिश मीडियम स्कूल व व्यावसायिक शिक्षणासाठी याच भागासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणासाठी येत असतात.
संपूर्ण गावामध्ये दिवसभर वर्दळ असते. मुख्य बाजारपेठेतून व गावातून जाणारा मल्हारपेठ-पंढरपूर हा एकमेव मार्ग असल्याने स्थानिक व्यापाऱ्यांची तसेच ग्रामस्थांची वाहने व खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची वाहनेही याच मार्गावर लावलेली असतात.
चारचाकी व दोनचाकी वाहनांसाठी कुठेही वाहनतळ नाही. त्यामुळे काही वाहनचालक राज्यमार्गाच्याकडेला किंवा बसस्थानक परिसरात वाहने पार्किंग करून खरेदीसाठी व बँक, शासकीय कामांसाठी जात असतात. त्यामुळे बेशिस्त पार्किंग करून गेलेल्या वाहनचालकांमुळे राज्यमार्गावर सतत वाहतुकीची कोंडी तासन्तास होत असते.
त्यामुळे अनेक लांब पल्ल्याच्या बसेस बसस्थानकावर न येता चांदणी चौकातूनच विटा, सांगली, वडूज, दहिवडी, बारामतीकडे जातात. विटा आगाराने आठवडा बाजारदिवशी एसटी बसस्थानकावर येणार नाही, असे पत्रच संबंधितांना दिले आहे.