सांगलीची मागणी तरीही माणमध्ये पाणी !

By admin | Published: May 16, 2016 12:48 AM2016-05-16T00:48:09+5:302016-05-16T00:49:12+5:30

किरकसाल येथे ग्रामस्थांनी केले जलपूजन : अरुण गोरेंचा विरोधकांना टोला

Sangli's demand still water! | सांगलीची मागणी तरीही माणमध्ये पाणी !

सांगलीची मागणी तरीही माणमध्ये पाणी !

Next

दहिवडी : ‘उरमोडी योजनेचे पाणी आ. जयकुमार गोरे यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे किरकसालच्या बोगद्यातून पुन्हा एकदा माण तालुक्यात झेपावले आहे. ऐन दुष्काळात तीव्र पाणीटंचाई असताना हे पाणी आल्याने दिलासा मिळणार आहे. गेल्या साडेतीन वर्षांपासून आ. गोरेंनी वारंवार उरमोडीचे पाणी माण-खटावमध्ये आणूनही कोकलणाऱ्या बिनकामाच्या विरोधकांना आता पुन्हा एकदा चपराक बसली आहे,’ असा टोला माण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण गोरे यांनी लगावला.
दरम्यान, यावेळी त्यांनी सांगली जिल्ह्याची मागणी असतानाही माण तालुक्यात पाणी आणल्याचे स्पष्ट केले.
रविवारी उरमोडी योजनेचे पाणी किरकसाल बोगद्यातून माण तालुक्यात आल्यानंतर जलपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला किरकसाल येथील ग्रामस्थ उपस्थित होते. दुष्काळात माण तालुक्यात आलेले पाणी पाहून सर्वांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आनंद दिसून येत होता. सर्वांनीच उरमोडीच्या या पाण्याचे उत्साहात पूजन केले. त्यानंतर बोराटवाडी येथे अरुण गोरे यांची पत्रकार परिषद झाली.
यावेळी बोलताना सभापती अरुण गोरे म्हणाले, ‘माण-खटावच्या मातीला लागलेला दुष्काळी कलंक कायमचा मिटवण्यासाठीच आ. जयकुमार गोरे यांनी सुरूवातीपासूनच प्रयत्न केले. उरमोडी योजनेसाठी आघाडीच्या कार्यकाळात कित्येक पट अधिक निधी आणून रखडलेली कामे मार्गी लावली. विधानसभेच्या पहिल्या निवडणुकीत माणदेशी जनतेला दिलेल्या शब्दाप्रमाणे साडेतीन वर्षातच म्हणजे २०११-१२ मध्ये कण्हेर जोड कालव्याची कामे युद्धपातळीवर मार्गी लावून ऐन दुष्काळात सलग २७९ दिवस उरमोडीचे पाणी येरळवाडी तलावात सोडले होते.
त्यानंतरच्या काळात पंपहाऊस एक व दोनची क्षमता वाढवून पाणी माण तालुक्यात आणण्यासाठी आमदार गोरेंनी जोरदार प्रयत्न केले होते. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात अधिकाऱ्यांच्या अनेक बैठका घेवून कॅनॉलचीही कामे
पूर्ण केली. आमदारांच्या प्रयत्नांना यश येवून २४ आॅगस्ट २०१४ रोजी उरमोडीचे पाणी पहिल्यांदा माण तालुक्यात पोहचले होते. त्यावेळीही हजारोंच्या संख्येने माणदेशी जनता जलपूजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होती.
त्याचबरोबर यावर्षीही १४ जानेवारीला पुन्हा एकदा उरमोडी योजनेचे पाणी जनतेच्या मागणीनुसार माणमध्ये आणले होते. दरम्यानच्या काळात कॅनॉल, पंपहाऊस, भूसंपादनाच्या कामासाठीही आमदार गोरेंनी विशेष प्रयत्न केले
आहेत.
प्रमाणिक आणि निरंतर प्रयत्नांमुळे उरमोडीचे पाणी माण तालुक्यात येत आहे. मात्र, पाण्यासाठी काहीच प्रयत्न न करणारे किंबहुना ज्यांना माण-खटावच्या मातीशी देणे घेणे नाही. असे रिकामटेकडे आणि पात्रता नसणारे विरोधक येणारे पाणी दिसत असूनही कायमच कोकलत आहेत, त्यांना आमदार जयकुमारे गोरेंच्या प्रयत्नांनी वेळोवेळी चपराकही दिलेली आहे, तरीही त्यांना याचा नेहमीच विसर पडत आलेला आहे.
रविवारी आलेल्या उरमोडी योजनेच्या पाण्यामुळे दु्ष्काळातही येथील जनतेला दिलासा मिळाला आहे. त्यामुळे सर्वांच्याच चेहऱ्यावर आनंद दिसू येत होता. यापुढेही माण-खटावच्या विकासासाठी आमदार गोरे यांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहेत.‘
या पत्रकारपरिषदेस दादासाहेब काळे, सोमनाथ भोसले, दिगंबर राजगे, आप्पा बोराटे, बाळासाहेब पिसे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Sangli's demand still water!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.