बनावट नोटांमागील ‘सूत्रधार’ सांगलीचा

By Admin | Published: July 12, 2015 12:39 AM2015-07-12T00:39:51+5:302015-07-12T00:39:51+5:30

आणखी दोघांची नावे निष्पन्न : चौघांना कोठडी; शोधासाठी छापे

Sangli's 'formula' behind the fake notes | बनावट नोटांमागील ‘सूत्रधार’ सांगलीचा

बनावट नोटांमागील ‘सूत्रधार’ सांगलीचा

googlenewsNext

सांगली : बनावट नोटांची छपाई करून त्या चलनात आणू पाहणाऱ्या टोळीचा खरा सूत्रधार (मास्टरमार्इंड) सांगलीतील असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्यासह आणखी दोघांची नावे चौकशीतून पुढे आली आहेत. त्यांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे छापासत्र सुरू आहे. दरम्यान, अटकेत असलेल्या दत्तवाड (ता. शिरोळ) येथील चौघांना न्यायालयाने १४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मिरजेत शुक्रवारी बनावट नोटा खपविण्यासाठी आलेला ऐनुद्दीन गुलाब ढालाईत (वय ५०) सापडला होता. त्याच्याकडून सुमारे ३४ लाख ३५ हजारांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. त्याच्या चौकशीत सुभाष शिवगोंडा पाटील (५०), रमेश कृष्णा घोरपडे (४८), इम्रान ऐनुद्दीन ढालाईत (२५, सर्व रा. दत्तवाड) या तिघांची नावे निष्पन्न झाली होती. बनावट नोटांच्या छपाईचा कारखाना दत्तवाडमध्ये असल्याचे समजताच पथकाने तेथेही छापा टाकला होता. कारखान्यातील स्कॅनर, प्रिंटर, रंगीत झेरॉक्स यंत्र, कटिंग यंत्र असे दीड लाखाचे साहित्य जप्त केले होते. याप्रकरणी पोलीस नाईक दीपक पाटील यांनी रात्री उशिरा मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानंतर चौघांना अटक केली होती.
या प्रकरणाचा खरा ‘मास्टरमार्इंड’ सांगलीत असल्याची कबुली संशयितांनी दिली आहे. या मास्टरमार्इंडचा आणखी एक साथीदार असून, तोही सांगलीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या शोधासाठी एक स्वतंत्र पथक तैनात केले आहे. (प्रतिनिधी)
घरांवर छापे
अटकेतील चौघांच्या घरावर पोलिसांनी पुन्हा छापे टाकून झडती घेतली. मात्र काहीच सापडले नाहीत. त्यांच्याविषयी गावातही चौकशी सुरू ठेवली आहे. नोटा छपाई करताना सांगलीतील मास्टरमार्इंड स्वत: हजर होता; पण हे चौघे सापडल्याचे समजताच त्याने पलायन केले आहे. त्याच्या घरावर पोलिसांनी दोनवेळा छापा टाकला आहे.
बनावट नोटा चलनात आणल्या नसल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट
संशयितांनी मिरजेतील एकास गाठून त्याच्यामार्फत नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न सुरू ठेवला होता. या व्यक्तीस ३४ लाखांच्या नोटा देऊन त्याच्याकडून ते खऱ्याखुऱ्या दहा लाखांच्या नोटा घेणार होते, पण तत्पूर्वीच पोलिसांना खबर लागल्याने चौघे सापडले. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी या नोटांची छपाई केली होती. यापूर्वी त्यांनी नोटांची छपाई केलेली नाही; तसेच बनावट नोटा कोठेही चलनात आणल्या नसल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. मास्टरमार्इंड आणि त्याचा साथीदार या दोघांच्या नावांबाबत पोलिसांनी गोपनीयता बाळगली आहे. त्याला येत्या एक-दोन दिवसांत पकडले जाईल, असे पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट यांनी सांगितले.

Web Title: Sangli's 'formula' behind the fake notes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.