अंगापूर वंदन येथे ‘राष्ट्रवादी’मध्येच लढत
By admin | Published: October 29, 2015 11:20 PM2015-10-29T23:20:21+5:302015-10-30T23:16:51+5:30
ग्रामपंचायत निवडणूक : ११ जागांसाठी २३ उमेदवार रिंगणात
संदीप कणसे- अंगापूर वंदन, ता. सातारा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ११ जागांसाठी २३ जण रिंगणात आहेत. त्यामुळे निवडणूक चुरशीची होणार आहे. सध्या गुप्त बैठका, जेवणावळी व गाठीभेटींना जोर आला आहे.
सातारा तालुक्यामध्ये ज्या महत्त्वपूर्ण व मोठ्या ग्रामपंचायती आहेत. त्यामध्ये अंगापूर वंदन ग्रामपंचायतही आहे. यामुळे या ग्रामपंचायत निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. या पंचवार्षिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादीअंतर्गत एवार्जीनाथ ग्रामविकास पॅनेल व एवार्जीनाथ पॅनेल अशी दोन पॅनेल लढत आहेत. पॅनेलकडून प्रत्येकी ११ उमेदवार उभे केले आहेत. एक अपक्षासह एकूण २३ जण रिंगणात आहेत. ही निवडणूक अत्यंत चुरशीची व अटीतटीची होईल, असे मानले जात आहे.
या निवडणुकीची मोर्चेबांधणी गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती. या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी असल्याने इच्छुक उमेदवारांनी आपापल्या नेत्याकडे उमेदवारी मिळावी म्हणून हट्ट धरला होता. एकूण ४७ जणांनी यासाठी अर्ज दाखल केले होते; परंतु अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी २३ अर्ज राहिल्यामुळे ही निवडणूक रंगदार होईल, असे बोलले जात आहे. यामध्ये खुल्या वर्गातून एका अपक्षाचाही निवडून येण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. दोन्ही पॅनेलचे उमेदवार निवडताना पॅनेल प्रमुखांना इच्छुक उमेदवारांना समजूत घालताना नाराजीला सामोरे जावे लागत होते. यासाठी वाडा, भावकी, घर, निष्ठा व लोकप्रतिमा याही बाबीचा विचार करावा लागला. तरीही नाराज व निवडणुकीतून माघार घेतलेल्या उमेदवार नाराजीतून काय भूमिका घेतात व कोणत्या पॅनेलच्या उमेदवारांच्या पाठीमागे उभे राहतात, हेही पाहावे लागणार आहे.
दि. १ नोव्हेंबर रोजी निवडणूक होत असून, तारीख जवळ येऊ लागली आहे, तशी रंगत वाढू लागली आहे. गुप्त बैठका, जेवणावळी होऊ लागल्या आहेत. उमेदवार व कार्यकर्ते पदयात्रा व घरोघरी प्रचार करताना दिसत आहेत. तर महिला उमेदवार हळदी-कुंकु घेऊन घरोघर महिला वर्गाशी संपर्क साधत आहेत. बॅनरबाजीने चौक फुलून गेले आहेत. आरोप-प्रत्यारोप, डाव-प्रतिडाव करून मतदारराजास आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. तर अपक्ष मात्र मी निवडून येणार, असे सांगत आहे. असे असले तरी लोकशाहीतील मतदारराजा काय करतोय हे मात्र दि. ३ नोव्हेंबरच्या निकालानंतरच समजणार आहे.
वरिष्ठ नेते निवडणुकीपासून दूर...
अंगापूर वंदनमध्ये दोन्ही पॅनेल खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे यांचे नेतृत्त्व मानणारी आहेत. परंतु वरिष्ठ नेते मात्र कुठेही सहभागी होताना दिसत नाहीत. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्ह्यातील ३३ गावे संवेदनशील असल्याचा अहवाल तयार केला आहे. त्यामध्ये अंगापूर वंदनचा समावेश आहे. यामुळे शासकीय यंत्रणासुद्धा लक्ष ठेवून आहे.