नकुसाने कर्ज काढून बांधले चक्क स्वच्छतागृह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 11:00 PM2018-10-26T23:00:58+5:302018-10-26T23:01:05+5:30
स्वप्नील शिंदे। लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : मुलगी जन्माला आल्यानंतर पूर्वी आई-वडिलांना नकोशी वाटायची. त्यामुळे त्या मुलीचेही नाव नकुसा ...
स्वप्नील शिंदे।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : मुलगी जन्माला आल्यानंतर पूर्वी आई-वडिलांना नकोशी वाटायची. त्यामुळे त्या मुलीचेही नाव नकुसा ठेवले जायचे. परंतु आई-वडिलांना ‘नकोशा’ झालेल्या या नकुसा सध्या अनेक ठिकाणी आदर्श काम करत आहेत. अशाच नकुसाची कहाणी समाजापुढे आदर्श निर्माण करणारी आहे. वाई तालुक्यातील शेलारवाडी येथील नकुसा पवार यांनी स्वच्छ भारत अभियानामध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले असून, त्यांनी स्वच्छतागृह बांधण्यासाठी बचत गटातून चक्क कर्ज काढले आणि स्वच्छतागृह बांधून गाव हागणदारीमुक्तीसाठी योगदानही दिले.
राज्यातील पहिला हागणदारी मुक्त जिल्हा तसेच स्वच्छ सर्वेक्षणमध्ये देशात प्रथम क्रमांक पटकावण्याचा मान साताऱ्याने मिळविला. यासाठी हजारो लोकांनी शौचालय बांधून आपले योगदान दिले. त्यामध्ये अनेकांनी स्वत:चे दागिने गहाण ठेवून तर काहींनी शैक्षणिक फीचा वापर स्वच्छतागृह बांधण्यासाठी केला आहे. ही योजना यशस्वी करत असताना दारिद्र्य रेषेखालील कुटुंबीयांना स्वच्छतागृह बांधण्यासाठी निधी उभारण्याचे मोठे आव्हान होते. सरस्वती बचत गटाच्या सदस्या असलेल्या नकुसा पवार यांना स्वच्छतागृह बांधण्यासाठी पैशांची चणचण भासत होती. त्यांनी बचत गटाकडून २० हजार रुपयांचे कर्ज घेतले. घराच्या आवारात वैयक्तिक स्वच्छतागृह बांधले. त्यांच्यासारख्या हजारो महिलांनी दिलेल्या योगदानामुळे जिल्हा हागणदारीमुक्त होण्यास मदत झाली आहे. अशा या नकुसा पवार यांच्या जिद्दीला प्रशासनाने सलाम केला आहे. नावात नकोशा असलेल्या नकुसाने सगळ्यांसमोरच आदर्श निर्माण केला. तिच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्रापंचिक खर्चासाठी अनेकजण कर्ज काढतात. परंतु शौचालयाची गरज ओळखून कर्ज काढणारी नकुसा ही विरळच आपल्या समाजात पाहायला मिळेल. त्यामुळेच या नकुसाची शासनानेही दखल घेतली आहे.
२८५ नकुसांचे बदलले नाव
नकुसा नाव असलेल्या मुलींना समाजात वेगळे स्थान निर्माण व्हावे, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा, यासाठी जिल्हा परिषदेने नकुसा नाव असलेल्या मुलींचे नामकरण करण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यात नकुसा नाव असलेल्या मुलींचा चक्क शोध घेतल्यानंतर नकुसा नाव असलेल्या २८५ मुली असल्याचे पुढे आले. त्यानंतर जिल्हा परिषदेने तत्काळ या मुलींची नावे बदलण्याचा निर्णय घेतला. एका शानदार कार्यक्रमात या नकुसांचे नामकरण करण्यात आले. याच मुली आता वेगवेगळ्या माध्यमातून समाजापुढे आदर्श निर्माण करत आहेत.
आमच्याकडे यापूर्वी स्वच्छतागृह होते. मात्र, त्याची पडझड झाली होती. मागील प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल मंजूर झाले. स्वच्छतागृह बांधण्यासाठी पैसे कमी पडल्याने कुटुंबीयांनी बचत गटातून कर्ज काढून शौचालय बांधण्याचा निर्णय घेतला.
- नकुसा पवार, शेलारवाडी, ता. वाई