दुकानात सॅनिटायझर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:29 AM2021-02-22T04:29:05+5:302021-02-22T04:29:05+5:30
जनावरांचा त्रास वडूज : शहरात मोकाट जनावरांच्या झुंडीच्या झुंडी फिरत असून, अनेकदा ही जनावरे रस्त्यावरच ठाण मांडून बसत आहेत. ...
जनावरांचा त्रास
वडूज : शहरात मोकाट जनावरांच्या झुंडीच्या झुंडी फिरत असून, अनेकदा ही जनावरे रस्त्यावरच ठाण मांडून बसत आहेत. नागरिकांबरोबरच वाहनधारकांनाही याचा नाहक त्रास होत आहे. या जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
क्षेत्र माहुलीजवळ खड्डे
सातारा : कोरोना लॉकडाऊनपूर्वी सातारा-लातूर महामार्गाच्या कामासाठी क्षेत्र माहुली ते कृष्णा नदी पुलादरम्यान सुमारे ७०० मीटर रस्ता खणून पडला असून, त्यामध्ये आज अक्षरश: तीन ते चार फुटांचे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या ठिकाणी दररोज अपघातासारख्या घटनेत वाढ होत आहेत.
कोरोनामुळे भीती
खटाव : खटाव तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खटावमध्ये काही दिवसांपूर्वी कोरोना रुग्णसंख्या कमी होती. मात्र, सध्या नव्याने काही गावांमध्ये कोरोनाचे संक्रमण दिसून येऊ लागले आहे. तसेच रुग्णसंख्याही वाढू लागली आहे.
बसची मागणी
सातारा : राज्य परिवहन महामंडळातर्फे लांब पल्ल्याच्या गाड्या वाढविण्यात आल्या आहेत. मात्र ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय होत आहे. पुणे, मुंबईहून साताऱ्यात आलेल्या काहींना मूळ गावी जावे लागते. मात्र, वाहन नसल्याने खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो.
पाण्याचा जास्त वापर
सातारा : शहराच्या लगत असणारे अनेकजण महादरे तलावात वाहने धुण्यासाठी नेत असतात. मात्र बहुतांशजणांनी सोसायटीतील साठवण टाकीतून गाड्या धुतल्या. यासाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर झाल्याने काही नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
स्वच्छतागृहाची गरज
सातारा : साताऱ्यात जिल्ह्याच्या विविध भागातून नागरिक शासकीय, निमशासकीय तसेच खासगी कामासाठी येत असतात. मात्र त्यांच्यासाठी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृह नसल्याचे दिसत आहे. राजवाड्यापासून पोवई नाक्यापर्यंत एकाही ठिकाणी स्वच्छतागृह नसल्याने गैरसोय होत आहे.
पिकअप् शेडची मागणी
रहिमतपूर : साताऱ्यापासून काही अंतरावर असलेल्या रहिमतपूर परिसरातील अनेक गावांमध्ये एसटी पिकअप् शेड नाही. त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिकांना एसटीची वाट पाहण्यासाठी भर उन्हात थांबावे लागते. त्यामुळे त्यांचे हाल होत आहेत. या मार्गावर ठिकठिकाणी पिकअप् शेड तयार करण्याची मागणी केली जात आहे. उन्हामध्ये बराचवेळ लोकांना वाट पाहावी लागत आहे.
वृक्षतोडीकडे दुर्लक्ष
सातारा : परळी, ता. सातारा या परिसरात अनेक ठिकाणी सामाजिक वनीकरण हद्दीत वृक्षतोड करण्यात आली आहे. डोंगरात गुरे चरण्यासाठी घेऊन जाणाऱ्यांकडून अशा प्रकारच्या कृती केल्या जात आहेत. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.
कुत्र्यांच्या झुंडी
सातारा : शहरात जागोजागी कुत्र्यांच्या झुंडी फिरत आहेत. यातील श्वान वाहनधारकांवर हल्ला करताना पाहायला मिळत आहेत. रस्त्याने चालणाऱ्या लोकांना देखील कुत्र्यांचा त्रास सोसावा लागत आहे. मात्र सातारा नगरपालिकेने या समस्येकडे सोयीस्करपणे झाकून घेतले आहेत.