संजय राऊत मग सरोगेट मदर बेबी, राजेश क्षीरसागर यांचा घणाघात
By दीपक शिंदे | Published: March 13, 2023 07:26 PM2023-03-13T19:26:04+5:302023-03-13T19:26:34+5:30
खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटातील ५० आमदार टेस्टट्यूब बेबी असल्याची टीका केली होती
सातारा : ‘राजकारणात टीका करताना मर्यादा पाळाव्या लागतात. पण, खासदार संजय राऊत ज्येष्ठ असूनही काहीतरी बोलत सुटतात. त्यांना लोकं कंटाळलेत. त्यांनी आमच्या ५० आमदारांवर टेस्टट्यूब बेबीची टीका केली. त्यांनीच राऊतांना मतदान केले होते. मग राऊत सरोगेट मदर बेबी ठरले,’ असा घणाघात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केला.
सातारा येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सातारा लोकसभा मतदारसंघ संपर्कप्रमुखपदी निवड झाल्यानंतर प्रथमच ते साताऱ्यात आले होते. यावेळी त्यांनी शिवसेनेची (शिंदे गट) बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद झाली. यावेळी जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव उपस्थित होते.
राजेश क्षीरसागर म्हणाले, ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार राज्यात शिवसेनेची बांधणी सुरू आहे. विधानसभा, लोकसभा मतदारसंघनिहाय संपर्कप्रमुखपदाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सातारा लोकसभा संपर्कप्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच साताऱ्यात आलो. या ठिकाणचे शिवसेनेचे चित्र चांगले दिसून आले. येथे पक्षाची भक्कम बांधणी झाली आहे. जिल्ह्यात आठपैकी दोन आमदार पक्षाचे आहेत. आगामी काळात सातारा जिल्हा हा शिवसेनेचाच होईल, असा विश्वास आहे.
राज्य शासन विकासाच्या दिशेने जात आहे. सातारा जिल्ह्यातील नियोजन समितीचा निधी लॅप्स होणार नाही. अजून काही दिवस आहेत. साताऱ्याचे पालकमंत्री निधी खर्चासाठी सक्षम आहेत. त्यामुळे मार्चअखेर निधी कामावर खर्च होईल, असेही क्षीरसागर यांनी स्पष्ट केले. याचबरोबर त्यांनी सातारा लाेकसभा मतदारसंघाचा उमेदवार ठरविण्याचा अधिकार मला नाही. पण, निवडणुकीत कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही, हे पाहू असा विश्वासही पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
सातारा लोकसभेसाठी सक्षम उमेदवार...
पत्रकार परिषदेत भाजपचे जिल्हाध्यक्ष व आ. जयकुमार गोरे यांनी राज्याचे पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतीत, असे वक्तव्य केल्याचा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला. यावर क्षीरसागर यांनी आता मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आहेत आणि पुढचेही म्हणून मी त्यांच्याकडेच पाहतो, असे उत्तर दिले, तर सातारा लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी भाजपने तयारी केल्याच्या प्रश्नावर त्यांनी पूर्वी भाजप-सेनेत कटशहाचे राजकारण होते. पण, आता तसे नाही. आता बरोबर आहोत. जागा वाटपाचा प्रश्न हा निवडणुकीपूर्वी असतो. त्यावेळी काय ते ठरेल. पण सातारा मतदारसंघात शिवसेना सक्षम उमेदवार देऊ शकते, असा दावाही केला.