अध्यक्षपदी संजीवराजेच
By admin | Published: March 21, 2017 11:06 PM2017-03-21T23:06:09+5:302017-03-21T23:06:09+5:30
जिल्हा परिषद : शिवेंद्रसिंहराजेंच्या दबावामुळे मानकुमरे यांची उपाध्यक्षपदी वर्णी
सातारा : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडी मंगळवारी अपेक्षेप्रमाणे बिनविरोध पार पडल्या. फलटणचे संजीवराजे नाईक-निंबाळकर अध्यक्षपदी, तर जावळीचे वसंतराव मानकुमरे उपाध्यक्षपदी निवडले गेले. पदाधिकारी निवडीत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बाजी मारली. जिल्हा परिषदेत तब्बल सहा वेळा निवडून आलेले संजीवराजे नाईक-निंबाळकर हेच अध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार होते. त्यांच्या नावाला कुणाचाच विरोध झाला नाही. अध्यक्षपदासाठी मानसिंगराव जगदाळे व वसंतराव मानकुमरे या दोघांनी दंड थोपटले होते. संजीवराजेंचे नाव अंतिम झाल्यानंतर कोणीही विरोध केला नाही. मात्र, उपाध्यक्षपदासाठी चढाओढ पाहायला मिळाली. मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत उपाध्यक्षपदाच्या निवडीवरून माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. शिवेंद्रसिंहराजेंनी जावळीत खासदार उदयनराजेंशी केलेल्या संघर्षाचे कारण पुढे करून उपाध्यक्षपदावर वसंतराव मानकुमरेंचे नाव अंतिम केले. दरम्यान, अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात मंगळवारी दुपारी सव्वादोन वाजता विशेष सभा पार पडली. अध्यक्षपदासाठी संजीवराजे नाईक-निंबाळकर व उपाध्यक्षपदासाठी वसंतराव मानकुमरे या दोघांचेच अर्ज दाखल झाल्याने पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी या दोघांच्या नावाची घोषणा केली. या निवडीनंतर जिल्हा परिषदेत कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण केली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी. बी. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवी शिवदास, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी या दोन्ही पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. जिल्हा परिषदेचे नूतन अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर व उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांना उचलून घेऊन त्यांच्या दालनातील खुर्चीत नेऊन बसविले. जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर तर कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या आवाजावर चांगलाच ताल धरला होता. (प्रतिनिधी)