लोककलावंतांच्या कार्यक्रमांवर कोरानामुळे संक्रात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:29 AM2021-05-30T04:29:38+5:302021-05-30T04:29:38+5:30

कुडाळ: कोरोनामुळे गावोगावच्या यात्रा, जत्रा, उत्सव यावर गतवर्षीच्या मार्च महिन्यापासून निर्बंध घालण्यात आले. यामुळे या काळात यात्रेनिमित्त होणारे तमाशाचे ...

Sankrat due to Korana on folk artist programs | लोककलावंतांच्या कार्यक्रमांवर कोरानामुळे संक्रात

लोककलावंतांच्या कार्यक्रमांवर कोरानामुळे संक्रात

Next

कुडाळ: कोरोनामुळे गावोगावच्या यात्रा, जत्रा, उत्सव यावर गतवर्षीच्या मार्च महिन्यापासून निर्बंध घालण्यात आले. यामुळे या काळात यात्रेनिमित्त होणारे तमाशाचे फड तसेच देव-देवतांचे होणारे गोंधळ, जागरणाचे कार्यक्रम सर्वच बंद झाले आहेत. त्यामुळे या कार्यक्रमातून आपली कला सादर करणाऱ्या लोककलावंतांच्या कलेवर मात्र संक्रांत आली आहे. हे कलावंत आर्थिक विवंचनेत सापडले असून, रोजगाराअभवी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

महाराष्ट्र हे लोककलांचे आगर आहे. यातही याचे खरे वैभव म्हणजे तमाशा. हा लोककलेचा एक प्रकार. अठराव्या शतकात सुरू झालेला तमाशा एकोणिसाव्या शतकापासून ते विसाव्या शतकाच्या मध्यकालापर्यंत बहरत गेला. शाहीर पठ्ठे बापूरावांचा काळ म्हणजे या कलेचा सुवर्णकाळ ठरला. यात्रा, जत्रांमधून मनोरंजन करत सामाजिक प्रबोधन साधण्याचा प्रयत्न यांच्याकडून होत होता. मात्र, कोरोनाच्या परिस्थितीमुळे तमाशाचे कार्यक्रम बंद झाले. त्याचबरोबर गोंधळ, भारुड, जागरण, कीर्तन आदी सर्वच लोककला आज थांबल्या आहेत. आपल्या पोटाची भूक भागवण्यासाठी कला सादर करणारा लोककलावंत मात्र आर्थिक विवंचनेत अडकला आहे.

गतवर्षी मार्च महिन्यात ऐन हंगामात कोरोनाच्या उद्रेकामुळे सर्वच ठप्प झाले. यात्रांचा हंगाम असल्याने याचा मोठा फटका तमाशा कलावंतांना बसला. फडमालकांच्या घेतलेल्या कामाच्या सुपाऱ्याही रद्द झाल्या. गतवर्षाची परिस्थिती आजही काहीशी तशीच आहे. अजूनही यात्रा, जत्रा, उत्सव यांना बंदीच घातलेली आहे. त्यामुळे यावर्षीसुद्धा या तमाशांचे खेळ होणार नाहीत. याचा परिणाम म्हणजे अशा परिस्थितीत फडमालक व तमाशा कलावंत हे मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. मुळातच आपल्या कलेच्या सादरीकरणातून मिळालेल्या बिदागीवरच त्यांचा उदरनिर्वाह चालत होता. मात्र, कोरोनाने सर्व काही हिरावून घेत त्यांचा रोजगरच नाहीसा केला. यामुळे पुन्हा कधी एकदा आपली कला प्रेक्षकांसमोर येईल आणि आपल्यालाही चांगले दिवस येतील, याचीच वाट पाहत आहेत.

(चौकट)

कार्यक्रमाला बंदी, रोजीरोटीचा प्रश्न..!

आज कोरोनाने सर्वच व्यवसाय ठप्प झाले आहेत. अशातच गेल्या दीड वर्षापासून महाराष्ट्राची लोककलाही याच्या विळख्यात सापडली आहे. यात्रा, जत्रा, उत्सव, धार्मिक कार्यक्रम बंद झाल्याने लोककलावंतांचा रोजगार नाहीसा झाला आहे. यामुळे कलावंत आर्थिक संकटात आहेत. गतवर्षी आणि यंदाही कार्यक्रमाला बंदी असल्याने त्यांच्यापुढे रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे पिढ्यानपिढ्या कलेचा वारसा जपणाऱ्या या कलावंतांना आज मात्र आर्थिक विवंचनेच्या छायेतच जीवन जगावे लागत आहे.

Web Title: Sankrat due to Korana on folk artist programs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.