Satara: कोयना पाणलोट क्षेत्रात संततधार; विसर्ग ५० हजार क्यूसेकवर, पाणीसाठा ८७ टीएमसीजवळ
By नितीन काळेल | Published: August 2, 2024 06:52 PM2024-08-02T18:52:46+5:302024-08-02T18:53:15+5:30
Satara News: सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेला पाऊस सुरूच असून कोयना धरण पाणलोट क्षेत्रात संततधार आहे. त्यामुळे धरणातून विसर्ग वाढविण्यात आला आहे. धरणाचे दरवाजे साडे दहा फुटांपर्यंत वर उचलण्यात आले असून त्यातून ५० हजार तर पायथा वीजगृहातून २ हजार १०० असा एकूण ५२ हजार १०० क्यूसेक विसर्ग सुरू झाला आहे.
- नितीन काळेल
सातारा - जिल्ह्याच्या पश्चिमेला पाऊस सुरूच असून कोयना धरण पाणलोट क्षेत्रात संततधार आहे. त्यामुळे धरणातून विसर्ग वाढविण्यात आला आहे. धरणाचे दरवाजे साडे दहा फुटांपर्यंत वर उचलण्यात आले असून त्यातून ५० हजार तर पायथा वीजगृहातून २ हजार १०० असा एकूण ५२ हजार १०० क्यूसेक विसर्ग सुरू झाला आहे. तर धरणात ८६.६३ टीएमसी साठा असून २४ तासांत महाबळेश्वरला सर्वाधिक १३५ मिलिमीटर पाऊस झालेला आहे.
जिल्ह्यात मागील १५ दिवसांपासून पाऊस होत आहे. पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. पण, पश्चिमेकडून पाऊस वाढतच चालला आहे. कोयना, नवजा, महाबळेश्वर, तापोळा भागात जोरदार पाऊस होत आहे. तसेच धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळी या धरणक्षेत्रातही पावसाचे प्रमाण चांगले आहे. त्यामुळे धरणातून विसर्ग सुरू झाला आहे. तर कोयना धरण पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून पुन्हा संततधार सुरू झाली आहे. परिणामी धरणात पाण्याचा येवा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शुक्रवारी सकाळच्या सुमारास सुमारे ५३ हजार क्यूसेक वेगाने पाणी येत होते. त्यामुळे धरण व्यवस्थापनने पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी कोयनेतील विसर्गात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार शुक्रवारी सकाळी धरणाचे सर्व सहा दरवाजे साडे दहा फुटापर्यंत वर उचलण्यात आले. त्यातून ५० हजार क्यूसेक वेगाने पाणी कोयना नदीत सोडले जात आहे. तर पायथा वीजगृहाची दोन्ही युनीट सुरूच असून त्यातून २ हजार १०० क्यूसेक विसर्ग सुरूच आहे. यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. तर कोयना धरणातील पाणीसाठा ८६.६३ टीएमसी झाला असून ८२.३१ टक्के भरलेले आहे.
शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ९६ मिलिमीटर पाऊस झाला. तर एक जूनपासून आतापर्यंत ३ हजार ८४९ मिलिमीटरची नोंद झालेली आहे. तसेच नवजाला आतापर्यंत ४ हजार ५६७ आणि महाबळेश्वरला ४ हजार २३३ मिलिमीटर पाऊस पडला आहे. त्यातच गेल्या १५ दिवसांत पश्चिमेकडे पर्जन्यमान अधिक झाल्याचे दिसून आले आहे.