संतोषचा गाळा आठ वर्षांपासून बंद
By admin | Published: August 28, 2016 12:07 AM2016-08-28T00:07:05+5:302016-08-28T00:07:05+5:30
शटरच्या आत दडलंय काय? : कसलाही व्यवसाय करायचा नव्हता तर कशासाठी घेतला; धोम ग्रामस्थांना प्रश्न
वाई : संतोष पोळने खून केलेले सहा मृतदेह त्याचे घर किंवा फार्म हाऊसवर पुरले होते, ही धक्कादायक माहिती समोर येत असतानाच संतोष पोळच्या एका गाळ्यामुळे ग्रामस्थांची चिंता वाढली आहे. धोम ग्रामपंचायतीचा गाळा त्याने ताब्यात घेतल्यापासून गेली आठ वर्षे बंद आहे.
जिल्ह्याबरोबरच राज्यभर वाई हत्याकांड गाजत आहे. मंगल जेधे खून प्रकरणात संतोष पोळ व त्याची प्रेयसी ज्योती मांढरे यांना अटक केली. २००३ पासून त्यांनी केलेल्या पापांची कबुली दिली. एक-दोन नव्हे तर तब्बल सहा खुनांची कबुली त्यांनी पोलिसांसमोर दिली आहे. त्यांच्या कृत्याची सीमा एवढ्यावर मर्यादित न राहता, त्याने खून केल्यानंतर सहा मृतदेह घर, फार्म हाऊसमध्ये पुरले होते. त्याच्याही पुढे जाऊन त्याने त्यावर झाडे लावली होती. त्यामुळे संतोषबरोबर त्याची स्थावर मालमत्ताही चर्चेत आली आहे.
संतोष पोळ हा २००५ ते २०१० या कालावधीत धोम ग्रामपंचायतीत बिनविरोध सदस्य म्हणून निवडून आला. या काळात त्याने सदस्यत्वाच्या अधिकाराचा गैरवापर केला. ग्रामस्थांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल करून दहशत निर्माण केली़ त्याने ग्रामपंचायतीद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दिले जाणारे गाळ्यापैकी एक गाळा गावातील एका महिलेला मिळाला असताना संतोषने तो गाळा २००८ मध्ये ताब्यात घेतला़
धोम बसथांब्याजवळील संबंधित गाळा गेल्या आठ वर्षांपासून बंद आहे़ कोणता व्यवसाय करायचा नव्हता तर गाळा कशासाठी ताब्यात घेतला. अन् घेतला तर तो गाळा त्याने उघडलेला ग्रामस्थांनी कधीही पाहिलेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांच्या मनात शंकेची पाल चुकचुकत आहे. (प्रतिनिधी)
असंख्य कृत्यांना काळी किनार
संतोषने ‘ओपीडी’साठी घेतलेली जागा २००६ ते २००९ या काळात त्याच्या ताब्यात होती. जागेचे मालक पोलिस पाटील महादेव पोळ यांनी परत मागितली असता त्याने त्यांच्यावर कोर्टात दावा दाखल केला़ तसेच बेकायदा कब्जा केला़ त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता ग्रामस्थांना पडलेला प्रश्न चुकीचे नाही.
दरम्यान, ग्रामस्थांशी संपर्क साधला असता आम्ही ग्रामसेवकांच्या उपस्थितीत सर्व ग्रामस्थ संबंधित गाळा उघडणार असल्याचे सांगण्यात आहे, अशी माहिती धोममधील ग्रामस्थांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.लवकरच उघडणार गाळा
संतोष पोळने वेगवेगळ्या कारनाम्यातून मानवतेला काळिमा फासण्याचे काम केले असून, त्याची संपूर्ण कारकीर्द संशयास्पद आहे़ तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून, त्याने २००३ पासून अनेक गंभीर गुन्हे राजरोसपणे केले़ त्याने थंड डोक्याने भयंकर हत्याकांड केल्याने संपूर्ण तालुक्यासह जिल्हा हादरून गेला़ याच काळात २००८ मध्ये पोळने हा गाळा घेतला होता. गाळा ताब्यात घेतला; पण त्यात कोणताही व्यवसाय सुरू केलेला नाही किंवा दुसऱ्यालाही भाड्याने दिला नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये या गाळ्याविषयी शंका व्यक्त केली जात आहे. शंकेचे निरसन करण्यासाठी हा गाळा लवकरच उघडण्यात येणार आहे.