चाफळच्या तलाठ्याचा सवता सुभा !
By admin | Published: December 17, 2014 09:30 PM2014-12-17T21:30:53+5:302014-12-17T23:03:42+5:30
ग्रामस्थांना अपमानास्पद वागणूक : मंडलाधिकाऱ्यांनी समज देऊनही ‘पहिले पाढे पंचावन्न’
चाफळ : चाफळ, ता. पाटण येथील सजाचे गावकामगार तलाठी सामान्य शेतकरी खातेदारांना दमबाजी करत असून, दाखले मागण्यास गेलेल्या खातेदारास आरेरावीची भाषा वापरत आहेत. सामान्य जनतेला विनयाने सेवा देणे हे प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याचे कर्तव्य असताना, हे महाशय सामान्य जनतेला रुबाब दाखवत आहे.
चाफळला नुकताच एक नवीन गावकामगार तलाठी दाखल झाला आहे. कार्यभार संभाळल्यापासून त्यांनी आपला सवता सुभा मांडला आहे. अनेक कारणास्तव बहुतेक शेतकऱ्यांना नेहमीच या कार्यालयाकडून दाखल्यांची आवश्यकता भासत असते; पण हे दाखले काढायला या कार्यालयात जायला शेतकरी घाबरू लागला आहे. कारण, हे महाशय विनयाने बोलणे; सोडाच शेतकऱ्यांना मोठ्या आवाजात बोलत कायद्याची भाषा शिकवत आहे. त्यातून सर्वसामान्य जनतेची पिळवणूक होत आहे. या तलाठ्याला विभागातील जनता कंटाळली असून, कायद्याचे डोस पाजणाऱ्या या महाशयाला विभागात सध्या अनेक ठिकाणी सुरू असलेल्या रस्त्यावरील बेकायदा माती, वाळू व दगडांची चोरटी वाहतूक दिसत नाही. सतत सर्वसामान्य जनतेला कायघाचे डोस पाजणारा तलाठी स्वत:चे काम तरी व्यवस्थित करतात का? हे वरिष्टांनी तपासून पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.
सध्या या कार्यालयातून देण्यात येणारे सात बारा खातेउतारा संगणकावरून खातेदारांना तत्काळ देणे बंधनकारक असताना तलाठी खातेदारांना जादा पैसे मोजण्यास लावून खातेदारांच्याच हातात थेट खातेपुस्तक देऊन सरळ त्याची झेराक्स काढण्यास पाठवित आहे. त्यामुळे जेवढे उतारे असतील तेवढी रक्कम शेतकऱ्यांना मोजावी लागत
आहे.
याशिवाय ज्या खाते पुस्तकात शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या नोंदी असतात, त्या नोंदीत कोणी फेरफार केल्यास खातेदाराच्या हातात पुस्तक देणे किती महागात पडू शकते, हे या त्यांना कोण सांगणार?
सध्या तलाठी कार्यालयात सातबारा घेताना लिखाण फी म्हणून प्रत्येक उताऱ्यास दहा रुपये प्रमाणे पैसे घेऊन पुन्हा झेराक्सचे अतिरिक्त पैसे सामान्य शेतकऱ्ंयाना मोजायला लावत आहेत. (वार्ताहर)
मी यापूर्वी दोनवेळा संबंधित तलाठ्याला समज दिली आहे. शेतकऱ्यांना त्रास होणार नाही, याची यापुढे काळजी घेतली जाईल. वेळेत कामे करण्याबाबत संबंधित तलाठ्याला सूचना केली आहे. पुन्हा एकदा याबाबत मी त्यांच्याशी बोलणार आहे.
- एस. बी. जाधव, मंडलाधिकारी
उत्खनन करणाऱ्यांची ‘चांदी’
संबंधित तलाठ्याची नियुक्ती झाल्यापासून परिसरात गौणखनिज व मुरूम उत्खननात वाढ झाली आहे. त्यावर या तलाठ्याचा अंकुश नाही. महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्याबाबत अनभिज्ञ ठेवले जाते. त्यामुळे कारवाई होत नाही. परिणामी, गौणखनिजाचे उत्खनन करणाऱ्यांचे
चांगलेच फावले आहे. दिवसाढवळ्या त्यांच्याकडून मुरूम व डबर
वाहतूक होत अहे.