सर्वोत्तम संशोधक पुरस्काराने सारंग भोला सन्मानित
By admin | Published: December 31, 2015 10:43 PM2015-12-31T22:43:50+5:302016-01-01T00:09:10+5:30
कृष्णा फाउंडेशन परिषद : राष्ट्रीय शोधनिबंध परिषदेची सांगता
कऱ्हाड : सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्ट्यिूटस् आॅफ मॅनेजमेंटचे प्राध्यापक डॉ. सारंग भोला यांना शिवाजी विद्यापीठातील सर्वोत्तम संशोधक म्हणून कृष्णा फाउंडेशनच्या पहिल्या राष्ट्रीय शोधनिबंध परिषदेमध्ये सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले.कृष्णा फाउंडेशनने आयोजित केलेल्या राष्ट्रीय शोधनिबंध परिषदेचे डॉक्टर फोरम सत्राने सांगता झाली. या परिषदेस देश भरातून मोठ्या संशोधकांनी हजेरी लावली होती.यावेळी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवदत्त शिंदे, कृष्णा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, डॉ. अजिंक्य डी. वाय. पाटीलचे कुलगुरू डॉ. एकनाथ खेडकर, शिवाजी विद्यापीठच्या कॉमर्स व व्यवस्थापन शाखेचे प्रमुख डॉ. श्रीकृष्ण महाजन, कृष्णा फाउंडेशनचे कार्यकारी संचालक डॉ. विनोद बाबर यांची प्रमुख उपस्थिती होती.कृष्णा फाउंडेशनने या वर्षीपासून शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात संशोधनामध्ये भरीव कार्य करणाऱ्या शिक्षण क्षेत्रातील संशोधकास पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला होता. संशोधकांना पाठबळ मिळावे, या हेतूने या पुरस्कारची सुरुवात या वर्षीपासून करण्यात आली आहे. राष्ट्रीय शोधनिबंधक परिषदेमध्ये सातारा येथील डॉ. सारंग भोला यांना पहिला सर्वोत्तम संशोधकाचा पुरस्कार मिळण्याचा मान मिळाला. यावेळी डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधनाचा आढावा घेत भविष्यातील संशोधनाच्या नवीन संधी शोधण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. यावेळी संशोधन क्षेत्रातील मान्यवर डॉ. आर. व्ही. कुलकर्णी, डॉ. ए. एम. गुरव, डॉ. उमेश देशमुख, डॉ. सारंग भोला, डॉ. पी. व्ही. मोहिते, डॉ. डी. के. मोरे, डॉ. एम. बी. भोसले, डॉ. आर. डी. कुंभार यांनी देशातून आलेल्या व पीएच.डी. व एमफीलच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी या परिषदेत सादर केलेल्या शोधनिबंधापैकी तीन शोधनिबंधक जाहीर करण्यात आले. यामध्ये प्रा. डॉ. पी. व्ही. मोहिते व तसेच प्रा. सुलक्षणा चव्हाण यांच्या शोधनिबंधकास सर्वोत्कृष्ठ शोधनिबंधकांचा मान मिळाला.यावेळी संदीप जाधव, अविनाश पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रा. अशोक लोखंडे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. जयकर पाटील यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)