Sarara: रुग्णवाहिकेसह तरुणाचा मृतदेह पोलिस मुख्यालयासमोर आणला, पांगारेतील ग्रामस्थ आक्रमक

By दत्ता यादव | Published: July 16, 2023 03:47 PM2023-07-16T15:47:56+5:302023-07-16T15:48:10+5:30

Satara: खुनी हल्ल्यात मृत्युमुखी पावलेल्या पांगारे, ता. सातारा येथील राहुल शिवाजी पवार (वय ३०) या तरुणाचा मृतदेह ग्रामस्थांनी रविवारी दुपारी एक वाजता रुग्णवाहिकेसह पोलिस मुख्यालयासमोर आणला.

Sarara: Ambulance brings body of youth in front of police headquarters, villagers in Pangare aggressive | Sarara: रुग्णवाहिकेसह तरुणाचा मृतदेह पोलिस मुख्यालयासमोर आणला, पांगारेतील ग्रामस्थ आक्रमक

Sarara: रुग्णवाहिकेसह तरुणाचा मृतदेह पोलिस मुख्यालयासमोर आणला, पांगारेतील ग्रामस्थ आक्रमक

googlenewsNext

- दत्ता यादव
सातारा  - खुनी हल्ल्यात मृत्युमुखी पावलेल्या पांगारे, ता. सातारा येथील राहुल शिवाजी पवार (वय ३०) या तरुणाचा मृतदेह ग्रामस्थांनी रविवारी दुपारी एक वाजता रुग्णवाहिकेसह पोलिस मुख्यालयासमोर आणला. त्यामुळे मुख्यालयासमोर काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. फरारी असलेल्या सात आरोपींना अटक करा, अशी आक्रमक मागणी करत ग्रामस्थांनी यावेळी घोषणाबाजीही केली. दरम्यान, पोलिसांनी संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह ठेवलेली रुग्णवाहिका पांगारेकडे मार्गस्थ झाली.

याबाबत अधिक माहिती अशी, सातारा तालुक्यामध्ये परळी खोऱ्यात पांगारे आणि राजापुरी ही दोन गावे शेजारी-शेजारी आहेत. ५ मे २०२३ रोजी एका अल्पवयीन मुलीच्या छेडछाडीवरून वाद झाला. राजापुरी गावातील तीसहून अधिक तरुण हातात काठ्या, लोखंडी राॅड घेऊन मध्यरात्री पांगारेत पोहोचले. त्यावेळी राहुल पवार आणि नयन पवार यांच्या घरावर जमावाने हल्ला केला. राहुलला घराबाहेर बोलावून त्यांनी पोटात लाथा मारल्या. यामध्ये राहुल गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने पुणे येथे नेण्यात आले.

मात्र, दोनमहिने उपचाराला प्रतिसाद दिल्यानंतर शनिवारी दुपारी त्याचा मृत्यू झाला. या प्रकारानंतर पांगारे ग्रामस्थांनी पुणे येथे धाव घेतली. दरम्यान, रविवारी सकाळी राहुलचा मृतदेह रुग्णवाहिकेतून पोलिस मुख्यालयासमोर आणण्यात आला. यावेळी पांगारे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. राहुलवर हल्ला करणाऱ्यांमध्ये पोलिस व राजकारण्यांची मुले आहेत. त्यांनाही या गुन्ह्यात सहआरोपी करावे, अशी मागणी ग्रामस्थ करत होते. सातारा शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा, शाहूपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी जमावाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमाव आक्रमक होत आरोपींना अटक झाल्याशिवाय इथून जाणार नाही, अशी भूमिका घेत होता. परंतु पोलिस निरीक्षक शहा आणि फडतरे यांनी अत्यंत संयमाने जमावाला कायदेशीर प्रक्रिया समजावून सांगितली. या प्रकरणात जी नावे समोर येतील, त्यातील कोणाचीही गय केली जाणार नाही, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर रुग्णवाहिका पांगारेकडे रवाना झाली.

जलद कृती दलाचा बंदोबस्त...
मुख्यालयासमोर मृतदेहासह रुग्णवाहिका आणल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जलद कृती दलाचे जवानही मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ तैनात करण्यात आले होते. याशिवाय सातारा शहर, शाहूपुरी आणि सातारा तालुका पोलिस ठाण्याचे कर्मचारीही मोठ्या संख्येने हजर होते.  

Web Title: Sarara: Ambulance brings body of youth in front of police headquarters, villagers in Pangare aggressive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.