सर्जा रंगात रंगला.. राजाही मिरवणुकीत रमला!
By admin | Published: July 18, 2016 11:10 PM2016-07-18T23:10:57+5:302016-07-19T00:22:49+5:30
जिल्ह्यात बेंदूर उत्साहात : ठिकठिकाणी पारंपरिक पद्धतीने मिरवणुका; विविध संदेशातून पर्यावरण जनजागृती
सातारा : बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा बेंदूर हा सण सातारा जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ज्यांच्याकडे बैलं नाहीत अशा घरांमध्ये मातीच्या बैलांची पूजा करण्यात आली तर अनेक ठिकाणी आपल्या सर्जा-राजाची अगदी थाटामाटात, वाजत-गाजत, अंगावर नवी झूल टाकून, शिंगांना व शरीराला रंगरंगोटी करून, पायात घुंगरू बांधून त्यांची मिरवणूक काढली.
बेंदूर सणाची लगबग घराघरांमध्ये पहाटेपासूनच सुरू झाली. प्रारंभी शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना नदीवर नेऊन त्यांना अंघोळ घातली. शिंगाला रंग लावून त्यांच्या अंगावर झूल टाकली. तसेच पायात घुंगरू बांधून बैलांच्या शरीरावर रंगांची उधळण केली. यानंतर पारंपरिक पद्धतीने बैलांची विधीवत पूजा केल्यानंतर त्यांना पुरण पोळीचा नैवेद्य देण्यात आला. यानंतर बैलांची गावात सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. सातारा तालुक्यात अनेक ठिकाणी सोमवारी हा विलोभनीय व पारंपरिक सोहळा मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. (प्रतिनिधी)
बळीराजाचंं राज्य येऊ दे...
पेट्री : जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून पावसाचा लहरीपणा सुरू आहे. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. पाऊस यावा आणि शेतकऱ्यांच्या इच्छा, आकांक्षा पूर्ण व्हाव्यात यासाठी जावळी तालुक्यातील कास व कुसुंबी येथील शेतकऱ्यांनी अनोख्या पद्धतीने बेंदूर साजरा केला. बैलाच्या अंगावर रंगरंगोटी ऐवजी ‘बळीराजाचं राज्य येऊ दे’ असा संदेश लिहून आपल दु:ख व भावना व्यक्त केल्या.
संदेशातून पर्यावरण जागृती
वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा होत चाललेला ऱ्हास ही आपणासमोरील सर्वात मोठी समस्या बनली आहे. यासाठी शासनस्तरावर विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. यात शेतकरीही मागे नाहीत. बेंदूर सणाला आपल्या लाडक्या बैलाच्या अंगावर ‘झाडे लावा झाडे जगवा’ असा संदेश लिहून जावळी तालुक्यातील कुसुंबीमुरा येथील शेतकऱ्याने एक प्रकारे पर्यावरण जागृती केली.