सरपंचही राजीनामा देत नाही, पण विचारांशी बांधील राहून खासदारकीचा राजीनामा दिला : उदयनराजे भोसले
By दीपक देशमुख | Published: January 9, 2024 05:44 PM2024-01-09T17:44:50+5:302024-01-09T17:45:05+5:30
सातारा : आजपर्यंत अनेक लोकसभा लढलो. पोटनिवडणुकीवेळी तर प्रत्येकाने सांगितले, उदयनराजे तुम्ही आत्महत्या करता आहात. कारण साधा सरपंचसुद्धा पदाचा ...
सातारा : आजपर्यंत अनेक लोकसभा लढलो. पोटनिवडणुकीवेळी तर प्रत्येकाने सांगितले, उदयनराजे तुम्ही आत्महत्या करता आहात. कारण साधा सरपंचसुद्धा पदाचा राजीनामा देत नाही. पण मी नवनियुक्त खासदार असूनही तीन महिन्यात मी राजीनामा दिला. कारण माझी बांधिलकी छत्रपती शिवरायांच्या विचारांशी आहे. जो छ. शिवरायांचे विचार आचरणात आणेल त्याच्याशी मी सहमत असेन, असे स्पष्ट मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.
सातारा येथे जलमंदीर पॅलेस येथे विश्वकर्मा योजनेच्या शुभारंभ केंद्रीय मंत्री अजयकुमार मिश्रा यांच्या हस्ते झाला. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. माजी आमदार मदन भोसले, माजी सभापती सुनील काटकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, विठ्ठल बलशेटवार, विकास गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी खा. उदयनराजे भोसले म्हणाले, शेवटच्या तीन महिन्यात कुणीही राजीनामा देईल. परंतु, निवडून आल्यनंतर पहिल्या तीन महिन्यात राजीनामा दिला. याचे कारण माझी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांशी बांधिलकी आहे. जे त्यांचे विचार आचरणात आणतो, त्यांच्या विचारांशी मी सहमत आहे. मी राजकारण कधी केले नाही व करणारही नाही. मी समाजकारण करणारा आहे. लोकांचे हित जोपासले जाईल, हाच माझा प्रयत्न असतो. ज्यांचे विचार पटत नाहीत, त्यांच्यासोबत जाणं हा ढोंगीपणा झाला.
खा. उदयनराजे पुढे म्हणाले, चुकीच्या गोष्टी मी स्पष्टपणे सांगितल्या तेव्हा मी घरचा आहेर दिला म्हणून ओरड झाली. पण मी जरी चुकीचा वागलो तर मलाही शिक्षा झाली पाहिजे, असे माझे स्पष्ट मत आहे. लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा लोकं आपणाला निवडून देतात, तेव्हा आपलंही कर्तव्य असतं की त्या लोकांच्या नजरेततून उतरू नये. परंतु, जो माणूस स्वत:च्या नजरेत पडतो, तेव्हा कुणाला तोंड दाखवू शकत नाही.
यावेळी अनेकजण यांनी उमेदवारीची मागणी केली आहे पण स्वतः उदयनराजे उमेदवारीबाबत अद्याप काही बोलत नाहीत, असा प्रश्न उपस्थित केला असता ज्या लोकांनी उमेदवारीची मागणी केली ती माझ्यासाठीच केली असल्याचे त्यांनी मिश्किलपणे सांगितले. यावेळी अजय मिश्रा यांच्या हस्ते विश्वकर्मा योजनेचा शुभारंभ झाला.