कोरोना प्रतिबंधावरून सरपंच, सदस्यांवर प्रश्नांची सरबत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:28 AM2021-06-02T04:28:49+5:302021-06-02T04:28:49+5:30

जिंती : गावामध्ये कोरोनाबाधित रुग्ण व मृत्यूचे प्रमाण वाढत असताना प्रभावी उपाययोजना राबविण्यासाठी जिंती ग्रामपंचायत कुचकामी ठरली आहे. तुम्हांला ...

Sarpanch over corona ban, barrage of questions on members | कोरोना प्रतिबंधावरून सरपंच, सदस्यांवर प्रश्नांची सरबत्ती

कोरोना प्रतिबंधावरून सरपंच, सदस्यांवर प्रश्नांची सरबत्ती

Next

जिंती : गावामध्ये कोरोनाबाधित रुग्ण व मृत्यूचे प्रमाण वाढत असताना प्रभावी उपाययोजना राबविण्यासाठी जिंती ग्रामपंचायत कुचकामी ठरली आहे. तुम्हांला लोकांची काळजी घेता येत नसेल, कोरोना रोखता येत नसेल तर सरपंचांसह सर्वांनी राजीनामे देऊन ग्रामपंचायतीवर अधिकारी नेमावा, अशा शब्दांत जिंती ग्रामस्थांनी सरपंच व सदस्यांचा समाचार घेतला.

फलटण तालुक्यातील जिंती ग्रामपंचायतीची ग्रामसभा सोमवारी सकाळी सरपंच शीतल रणवरे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. या सभेत कोरोना प्रतिबंधासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. प्रारंभी मागील सभेचे इतिवृत्त वाचन करण्यात आले. त्याप्रमाणे २०२०-२१ च्या वार्षिक जमा-खर्चाची माहिती देण्यात आली. लेखा परीक्षण अहवालाचे वाचन करून १५ वा वित्त आयोग सन २०२१-२२ च्या आराखड्यास दुरुस्तीसह मान्यता देण्यात आली.

दरम्यान, सभा सुरू झाल्यानंतर ग्रामस्थांनी कोरोनाचा मुद्दा उपस्थित करून सरपंच व सदस्यांवर प्रश्नांचा भडिमार केला. कोरोना रुग्ण वाढत असताना ग्रामपंचायतीने योग्य ती खबरदारी घेतली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. काही मोजके सदस्य व उपसरपंच, ग्रामसेवक, आशासेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक यांनी कोरोना रुग्ण आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले, मग सरपंच करू शकत नाही का? असा प्रश्न उपस्थित केला.

गावामध्ये विलगीकरण कक्ष तयार करण्यासाठी खूप उशीर केल्याने मृत्यूचे प्रमाण वाढले. अगोदरच योग्य पद्धतीने उपाययोजना केली असती तर रुग्णांना जीव गमवावा लागला नसता. ग्रामपंचायत सदस्यांमध्ये मतभेद असल्याने गावातील लोकांना वेठीस धरले जाते. गावामध्ये दारू व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आता किराणा दुकान, भाजी मंडई, मंदिरे, बंद आहेत. पण दारू व्यवसाय कसा सुरू आहे. यावर तोडगा का निघत नाही? ग्रामपंचायत सदस्यांना गावातील नागरिकांसाठी उपाययोजना करता येत नसेल तर राजीनामा देऊन ग्रामपंचायतीवर शासकीय अधिकाऱ्याची नेमणूक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

(चौकट)

विविध विषयांवर चर्चा

या बैठकीत महाराष्ट्र ग्राम समृद्ध योजनेचा पुरवणी आराखडा तयार करून या योजनेअंतर्गत लाभार्थी निवड करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. कोरोना परिस्थितीचा आढावा, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचा विकास करणे, या योजनेमध्ये शासन निर्णयाप्रमाणे राहिलेल्या वस्त्यांचा पुरवणी आराखडा तयार करणे, सामाजिक लेखा परीक्षण करणे, सांडपाणी घनकचरा आराखड्यास मान्यता देणे, संभाव्य पाणी टंचाईबाबत चर्चा करणे, १५ व्या वित्त आयोगाची कामे सुरू करणे आदी विषयांवर सभेत चर्चा करण्यात आली.

===Photopath===

310521\480320210531_194529.jpg

===Caption===

जिंती ग्रामपंचायत कार्यलय

Web Title: Sarpanch over corona ban, barrage of questions on members

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.