सरपंच परिषद महाराष्ट्र कोरोना उपाययोजनात प्रशासनाबरोबर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:39 AM2021-05-26T04:39:18+5:302021-05-26T04:39:18+5:30
सातारा : सरपंच परिषद मुंबई, महाराष्ट्र ही राज्यातील सरपंचांसाठी काम करणारी अधिकृत संघटना असून, कोरोना उपाययोजना राबवण्यात आम्ही प्रशासनाबरोबर ...
सातारा : सरपंच परिषद मुंबई, महाराष्ट्र ही राज्यातील सरपंचांसाठी काम करणारी अधिकृत संघटना असून, कोरोना उपाययोजना राबवण्यात आम्ही प्रशासनाबरोबर आहोत. कोणीही कामावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतलेली नाही, अशी माहिती परिषदेच्या वतीने जिल्हा परिषदेला देण्यात आली. तसेच याबाबत जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले यांना निवेदनही देण्यात आले.
सातारा जिल्हा परिषदेत जिल्ह्यातील सरपंच, उपसरपंच, सदस्यांच्या मागण्यांच्या अनुषंगाने अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, कृषी सभापती मंगेश धुमाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांची सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. तसेच बैठक झाली. यावेळी सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष नितीन पाटील, कार्याध्यक्ष आनंदराव जाधव, उपाध्यक्ष अरुण कापसे, सचिव शत्रुघ्न धनवडे, संपर्कप्रमुख चंद्रकांत सणस यांनी आपल्या समस्या सांगितल्या.
अध्यक्ष नितीन पाटील म्हणाले, सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामस्तरीय कमिटी यांच्यावर फ्रंटलाईन वर्कर म्हणून जबाबदारी टाकली असून, ती पार पाडत आहेत. त्यामुळे त्यांना कोरोना लसीकरण करणे आवश्यक आहे. पंधराव्या वित्त आयोगातून ऑक्सिजन मशीन खरेदीबरोबरच अन्य साहित्य खरेदी करता यायला हवे. जिल्हा परिषद सेस फंडातून विलगीकरण कक्षासाठी निधी देण्यात यावा. सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्या कोरोना कालावधीत गाड्या जप्त केल्या जात आहेत. त्यामुळे या सर्वांना ओळखपत्र देण्याची गरज आहे.
सरपंच परिषदेच्या मागण्या तत्काळ सोडवण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन प्रयत्न करत आहे. सरपंच, उपसरपंच या कोरोना संकटातही करत असलेले काम निश्चितच आदर्शवत आहे. संघटनेच्या मागण्या प्राधान्याने सोडवण्यात येतील, असे आश्वासन अध्यक्ष उदय कबुले यांनी दिले.
.........................................................................