सरसेनापती प्रतापराव गुजरवाड्याच्या देखभालीसाठी पाठपुरावा करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:43 AM2021-03-09T04:43:11+5:302021-03-09T04:43:11+5:30
औंध : ‘स्वराज्याचे तिसरे सरसेनापती प्रतापराव गुजर यांचा ऐतिहासिक वाडा भोसरे येथे आहे. ती जागा खासगी मालकीच्या नावावर असल्याने ...
औंध : ‘स्वराज्याचे तिसरे सरसेनापती प्रतापराव गुजर यांचा ऐतिहासिक वाडा भोसरे येथे आहे. ती जागा खासगी मालकीच्या नावावर असल्याने त्यांच्या वंशजांना इतर ठिकाणी शासनाने जागा उपलब्ध करून द्यावी व वाड्याची देखभाल दुरुस्ती ग्रामपंचायतीकडे वर्ग करावी,’ अशी मागणी भोसरे ग्रामपंचायत करणार आहे. त्यासंबंधित ठराव तयार करून विविध विभागांना देण्यात येणार आहे.
याबाबत माहिती अशी की, भोसरे येथे असणाऱ्या या ऐतिहासिक वास्तूची भिंत काही दिवसांपूर्वी पाडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर शिवप्रेमींमध्ये एकच संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर विविध संघटनांनी आवाज उठविला. वंशजांनाही राहण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न गावासमोर आला आहे. त्यामुळे भिंत पाडल्याने तक्रारीही झाल्या. ही जागा खासगी मालकीच्या नावावर असल्याचेही गावकरी सांगत आहेत. त्यामुळे या सर्व गोष्टींवर प्रशासनाने तोडगा काढून ऐतिहासिक वास्तूंची जपवणूक व्हावी ही सर्वसामान्य लोकांची मागणी आहे.
या ऐतिहासिक वास्तूचे जतन होण्यासाठी प्रशासनाने तातडीने लक्ष घालणे गरजेचे असून, शिवप्रेमींच्या भावनांचा आदर राखण्यासाठी विशेष निधी उपलब्ध होण्यासाठी लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत, ग्रामस्थ यांनी पाठपुरावा करणे गरजेचे बनले आहे.