सतारवादनाने श्रोते मंत्रमुग्ध
By admin | Published: February 13, 2015 08:57 PM2015-02-13T20:57:36+5:302015-02-13T23:00:37+5:30
नटराज महोत्सव : रुपक व तीन तालांची बंदिशने जिंकली मने
सातारा : येथील नटराज मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त आयोजित नटराज संगीत-नृत्य महोत्सवात पंडित रईस बाले खान यांनी सुरेख सतारवादन करून महोत्सवाचे पाचवे पुष्प गुंफले. ‘किरवाणी’ रागातील रुपक व तीन तालांची बंदिश सादर करून त्यांनी उपस्थितांची मने जिंकून घेतली. सतारीतून छेडल्या जाणाऱ्या तारा आणि राग वाजवून दाखवत उपस्थितांना आपल्या कलेची ओळख करून देताना टाळ्यांचा गजरात सातारकरांनी पं. रईस खान यांच्या सतार वाजवण्याला उत्स्फूर्त दाद दिली. त्यानंतर रईस खान यांनी ‘पहाडी धून’ मधून आलाप जोड व बंदिश सादर करीत सुप्रसिद्ध असे कानडी भाषेतील ‘भाग्यदा लक्ष्मी बारम्मा’ हे भजन वाजवून दाखवत मराठीतील ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ या अभंगावरही सतारीच्या तारा झंकारल्या. त्यानंतर आणखी एक कानडी भजन वाजवून दाखवत आपल्या कार्यक्रमाची सांगता केली. त्यांना तबला साथ करणारे अतुल कांबळे हे तबला वादक पं. मुकेश जाधव यांचे शिष्य आहे.पंडित रईस खान व अतुल कांबळे यांचा सत्कार सी. के. शहा यांच्या हस्ते मानचिन्ह व प्रशस्तिपत्रे देऊन करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)