ससून प्रकरणाला राज्य शासनच जबाबदार, शशिकांत शिंदे यांचा आरोप
By नितीन काळेल | Published: May 31, 2024 07:27 PM2024-05-31T19:27:11+5:302024-05-31T20:13:52+5:30
सातारा : गरिबांचे ससून रुग्णालय भ्रष्टाचाराचे कुरण झाले असून वादग्रस्त डाॅक्टरांना पुन्हा ठेवण्यात येत आहे. आताच्या पुणे अपघात प्रकरणातही ...
सातारा : गरिबांचे ससून रुग्णालय भ्रष्टाचाराचे कुरण झाले असून वादग्रस्त डाॅक्टरांना पुन्हा ठेवण्यात येत आहे. आताच्या पुणे अपघात प्रकरणातही हेच दिसले. त्यामुळे डाॅ. तावरे आणि इतर डाॅक्टरांना कोणत्या मंत्र्याने पाठिंबा दिला याची चाैकशी करावी. तसेच यामध्ये सातारा जिल्ह्यातीलही एक आमदार आहे. या सर्वाला राज्य शासनच जबाबदार आहे, असा थेट आरोप आमदार शशिकांत शिंदे यांनी केला.
साताऱ्यातील राष्ट्रवादी भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत आमदार शिंदे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, सरचिटणीस राजकुमार पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दीपक पवार आदी उपस्थित होते.
आमदार शिंदे म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील ससून रुग्णालयाबाबतच्या सुरस कथा बाहेर येत आहेत. याला सर्वस्वी शासनच जबाबदार आहे. राज्य सरकार, मंत्र्यांचे दुर्लक्ष आहे. तसेच वादग्रस्त डाॅक्टरांना त्यांचेच अभय आहे. सध्याची परिस्थिती पाहता चाैकशी समिती नेमण्यात आली असलीतरी तो एक फार्सच ठरणार आहे. कारण, हे सरकार आल्यापासून नुसत्या चाैकशी समितीच स्थापन करत आहे. त्यातून काहीही होत नाही. त्यामुळे या चाैकशी समितींची चाैकशी करण्याची वेळ आलेली आहे.
ससून रुग्णालयातील डाॅ. तावरे आणि इतर डाॅक्टरांना कोणत्या मंत्र्याने पाठिंबा दिला याची चाैकशी करावी. राज्य शासनानेही याबाबत खुलासा करावा. नाहीतर सरकारच संबंधित मंत्र्यांना पाठिशी घालत आहे असा लोकांत समज होईल, असे सांगून आमदार शिंदे पुढे म्हणाले, ससून रुग्णालयाबाबत आैषधांच्या तक्रारी आहेत. माणसं मरतायत. पैसे दिल्याशिवाय काम होत नाही. त्यामुळे ससूनमधील पूर्वीच्या घटांचाही तपास करण्याची गरज आहे.
रुबीमधील किडणी रॅकेटवरही भाष्य..
पुण्यातील रुबी रुग्णालयातील किडनी रॅकेटमध्येही काही डाॅक्टरांची नावे समोर आली होती. गरिबांना किडनी मिळत नाही. पण, याच गरिबांची किडनी श्रीमंताना मिळाली. किडनी रॅकेटचीही सीबीआय चाैकशी करावी. रुबीतील किडनी रॅकेटप्रकरणाचा अहवाल येण्यापूर्वीच रुग्णालयाच्या परवान्याचे नुतनीकरण करुन दिले आहे, असा आराेपही आमदार शिंदे यांनी केला.
आम्ही ३५ च्यावर गेलो तर राज्यात घडामोडी..
आमदार शशिकांत शिंदे यांनी लोकसभा निवडणूक निकालावरही भाष्य केले. ते म्हणाले, मी गल्ली गाजवली, तसेच आता दिल्लीही गाजवणार आहे. दिल्लीत आता इंडिया आघाडीचेच सरकार येईल. राज्यात आम्हाला ३० ते ३५ जागा मिळतील. महाराष्ट्रात ३५ च्यावर जागा मिळाल्या तर राज्यात लवकरच मोठ्या राजकीय घडामोडी होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.