सदाभाऊ खोत यांच्याकडे साताऱ्याचे सहपालकमंत्रिपद
By admin | Published: December 29, 2016 11:05 PM2016-12-29T23:05:33+5:302016-12-29T23:05:33+5:30
चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्रिपद
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याऐवजी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्रिपद दिले आहे. त्याशिवाय पाटील यांच्याकडे कोल्हापूरचे पालकमंत्रिपद कायम राहील. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे, तर सातारा जिल्ह्याचे सहपालकमंत्रिपद सदाभाऊ खोत यांच्याकडे देण्यात आले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी पहिल्यांदाच सहपालकमंत्रिपद निर्माण केले आहे. ज्या दोन मंत्र्यांमध्ये जिल्ह्याच्या कारभाराबाबत संघर्ष घडू शकतो त्या दोघांचेही समाधान अशाप्रकारे मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
एकनाथ खडसे महसूलमंत्री असताना ते जळगाव आणि बुलडाणाचे पालकमंत्री होते. त्यांच्या राजीनाम्यानंतर या दोन्हींचे पालकमंत्रिपद मुख्यमंत्री फडणवीस यांनी फुंडकर यांच्याकडे दिले. फुंडकर हे खडसे यांचे निकटवर्ती मानले जातात. आता जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या तोंडावर फुंडकर यांच्याकडून जळगावचे पालकमंत्रिपद काढण्यात आले आहे. जळगावच्या राजकारणात खडसे विरुद्ध जलसंपदामंत्री गिरीश महाजन या दोघांच्या संघर्षाचा फटका पक्षाला बसू नये आणि संघर्षाच्या प्रसंगात मध्यस्थी व्हावी यासाठी मुद्दाम चंद्रकांत पाटील यांना पालकमंत्रिपद दिल्याचे म्हटले जात आहे.
परिवहनमंत्री दिवाकर रावते हे आतापर्यंत परभणीचे पालकमंत्री होते. आता त्यांना उस्मानाबादचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे. पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर हे उस्मानाबादचे सहपालकमंत्री असतील.
गेल्या विस्तारात राज्यमंत्री झालेले भाजपचे मदन येरावार यांना यवतमाळचे पालकमंत्रिपद देण्यात आले असून तेथे आतापर्यत पालकमंत्री असलेले महसूल राज्यमंत्री शिवसेनेचे संजय राठोड यांना सहपालकमंत्रिपद देण्यात आले आहे.
राठोड हे आता वाशिमचे पालकमंत्री असतील. तेथे येरावार आता त्यांच्याकडे अकोल्याचे पालकमंत्री पद कायम ठेवण्यात आले आहे.
सातारामध्ये शिवसेनेचे राज्यमंत्री विजय शिवतारे पालकमंत्री आहेत. तेथे राज्यमंत्री आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांना सहपालक मंत्रीपद देण्यात आले आहे. सहकार मंत्री सुभाष देशमुख हे सांगलीचे पालकमंत्री असतील. राज्यमंत्री शिवसेनेचे गुलाबराव पाटील हे परभणीचे नवे पालकमंत्री असतील. आतापर्यंत हे पद दिवाकर रावते यांच्याकडे होते. (विशेष प्रतिनिधी)