भरपावसात सातारकरांनी घेतले योगाचे धडे

By admin | Published: June 21, 2015 10:23 PM2015-06-21T22:23:09+5:302015-06-22T00:25:14+5:30

जागतिक योग दिन : ‘लोकमत’ने आयोजित केलेल्या शिबिराला तरुण-तरुणींसह, वृद्धांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Satakar took lessons in yoga lessons | भरपावसात सातारकरांनी घेतले योगाचे धडे

भरपावसात सातारकरांनी घेतले योगाचे धडे

Next

सातारा : सकाळपासूनच सुरू झालेल्या रिमझिम पावसातही सातारकरांची पावले योगाभ्यासाकडे वळली अन् शेकडो नागरिकांनी योगसाधनेचा अद्भुत अनुभव घेतला. निमित्त होतं ते जागतिक योगदिनाचं.निरामय जीवनासाठी योगाला अवघ्या जगाने मान्यता दिली आहे. यंदापासून २१ जून हा जागतिक स्तरावर योगदिन म्हणून रविवारी संपूर्ण जगभरात हा दिवस मोठ्या उत्साहात पार पडला. जागतिक योगदिनानिमित्त ‘लोकमत’ने येथील स्वयंवर मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या योग शिबिराला सातारकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकाळी सात ते आठ यावेळेत आर्ट आॅफ लिव्हिंगचे योग प्रशिक्षक सुहास फरांदे, अभय चव्हाण, सागर जाधव यांनी सातारकरांना योगाचे धडे दिले.सुरुवातीला ‘लोकमत’चे संस्थापक दिवंगत जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर योग प्रशिक्षक सुहास फरांदे व सातारकरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून योगसाधनेला प्रारंभ करण्यात आला. सकाळी सात ते आठ यावेळेत योग प्रशिक्षकांनी प्रात्यक्षिकांसह योगाचे महत्त्व सांगितले. या योग शिबिरात लोकमतच्या सखी मंच, बालविकास मंच तसेच युवा नेक्स्टच्या सदस्यांनी सहभाग घेतला.सकाळी शहरात पावसाची संततधार सुरू असतानाही सातारकरांनी या योग शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. योग प्रशिक्षक सुहास फरांदे, सागर चव्हाण यांनी प्रात्यक्षिके करून दाखविली. त्यानुसार नागरिकांनी विविध आसने, प्राणायामाचे प्रकार केले. प्रत्येकाला रोज घरच्या घरीकरता येतील, अशी उपयुक्त आसने, अनुलोम-विलोम, भ्रामरी प्राणायाम असे विविध प्रकार शिकविण्यात आले. केवळ एक दिवसासाठी योगाचे महत्त्व न ठेवता प्रत्येकाने रोज काही वेळ योगासाठी दिल्यास त्याचा निश्चित फायदा होईल, असे फरांदे यांनी सांगितले.
या शिबिरानंतर आपणास आनंदी आणि प्रसन्न वाटू लागल्याच्या प्रतिक्रिया महिलांनी यावेळी व्यक्त केल्या. तर ही साधना आम्ही केवळ एक दिवसापुरती न करता कायम दररोज सकाळी करत राहू, असे काही तरुणांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Satakar took lessons in yoga lessons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.