आता मात्र सातारकरांची सटकली!
By admin | Published: October 23, 2015 10:11 PM2015-10-23T22:11:51+5:302015-10-24T00:47:11+5:30
तरुणाई खवळली : वर्दीवरील हल्ला असह्य; सहायक फौजदारास मारहाणप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा
सातारा : वाहतूक शाखेच्या सहायक पोलीस फौजदाराला बुधवारी झालेली मारहाण सातारकरांनी
केवळ पाहिली नाही. वर्दीवर हल्ला होताना पाहून महाविद्यालयीन तरुणांची सटकली आणि मारहाण करणाऱ्या तिघांना या तरुणांनी यथेच्छ झोडपले. वर्दीवरील हल्ले आम्ही उघड्या डोळ््यांनी पाहणार नाही, हा संदेशच सातारकरांच्या वतीने या तरुणांनी दिला आहे. दरम्यान, संबंधित सहायक फौजदाराला मारहाण केल्याप्रकरणी तिघांना अटक झाली असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.वाहतूक शाखेचे सहायक फौजदार बशीर अमीनुद्दीन मुल्ला (वय ५७) बुधवारी सायंकाळी पोवई नाका परिसरात मारहाण झाली. याप्रकरणी त्याच दिवशी अटक केलेल्या तीन जणांवर पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. दुचाकीवरून ‘ट्रिपलसीट’ जाताना पकडल्यानंतर ही मारहाण झाली होती. विशाल दत्तात्रय सुतार (वय २१, रा. गेंडामाळ झोपडपट्टी), शुभम उद्धव इंदलकर (वय २२, रा. कळंबे, ता. सातारा) आणि शाहरुख अस्लम शेख (वय २७, रा. यश ढाब्यामागे,
मेढा रस्ता, सातारा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.बुधवारी सायंकाळच्या सुमारास सहायक फौजदार मुल्ला (वय ५७) यांची ड्यूटी पोवई नाका परिसरात होती. मोनार्क हॉटेलकडून मरिआई कॉम्प्लेक्सच्या मागील रस्त्याने एका मोटारसायकलवरून तिघेजण येत असल्याचे पाहून मुल्ला यांनी त्यांना अडविले. त्यामुळे चिडून जाऊन त्या तिघांनी मुल्ला यांनाच धक्काबुक्की सुरू केली. त्याच वेळी रस्त्यावरून जाणाऱ्या काही महाविद्यालयीन युवकांनी हे दृश्य पाहून धाव घेतली आणि मारहाण करणाऱ्या तिघांना चोप दिला. त्यानंतर रात्री उशिरा या तिघांना शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
वाहतूक पोलिसांना उद्धटपणे बोलणे, त्यांच्यासमोर बड्यांना फोन करणे, हुज्जत घालणे, प्रसंगी धक्काबुक्की करणे असे प्रकार शहरात वाढत असतानाच जागरूक सातारकर तरुणांनी पोलिसांना मदत करून या तिघांना चोप दिल्याने अशा घटना लोक नुसतेच पाहत नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. वाहतूक शाखेचा पोलीस कर्मचारी म्हणजे आपले ‘कॉन्टॅक्ट’ दाखविण्याचे केंद्र अशीच बड्या धेंडांची समजूत आहे.
या वृत्तीतूनच नियम मोडणारे पोलिसांनाच फैलावर घेताना चौकाचौकात दिसतात. काही दिवसांपूर्वी राधिका रस्त्यावर पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर धावून गेलेल्यांची छायाचित्रे ‘लोकमत’ने प्रसिद्ध केली होती. पोवई नाका,
मोती चौक, कमानी हौद, शनिवार चौक अशा ठिकाणी विशेषत:
एकेरी वाहतूक सुरू असताना अशा घटना वारंवार घडतात. परंतु बुधवारी संध्याकाळी पोवई नाक्यावर महाविद्यालयीन युवकांनी
ज्याप्रमाणे सक्रिय सामाजिक हस्तक्षेपाचे धोरण स्वीकारून
वर्दीच्या अवमानाला जे चोख प्रत्युत्तर दिले, तो अशा प्रवृत्तींविरुद्धचा सातारकरांचा एल्गार ठरला आहे. (प्रतिनिधी)
थांब हवालदारा, फोन लावतो...
वाहतूक पोलिसाशी बोलताना अनेकदा उच्चपदस्थांशी आणि नेत्यांशी आपली असलेली सलगी दाखविण्याचा प्रयत्न केला जातो. चुकीच्या ठिकाणी पार्किंग करणे, पोलिसांचा डोळा चुकवून ‘नो एन्ट्री’तून बिनधास्त घुसणे, थोडक्यासाठी वळसा कशाला घालायचा अशा वृत्तीने वाहतुकीच्या नियमांची राजरोस पायमल्ली करणे साताऱ्यात नित्याचे झाले आहे. पोलिसांनी पकडून लायसेन्स वगैरेची मागणी केल्याबरोबर संबंधित व्यक्ती लगेच खिशातील सेलफोन काढून उच्चपदस्थ अधिकारी किंवा नेत्यांना कॉल लावतात. तोच फोन संबंधित पोलीस कर्मचाऱ्याच्या हातात दिला जातो आणि त्यावरून मिळणारा ‘संदेश’ ऐकून पोलीस कारवाई न करता वाहनधारकाला सोडून देतो.
‘त्यांचे’ मोबाइल काढून
घ्या
वाहतुकीचे नियम सर्वांसाठी समान आहेत आणि नियमांचा भंग कोणीही केला तरी सर्वांनाच त्रास होतो. नियम कोणीही तोडला तरी अपघाताची शक्यता असते. अशा वेळी बड्यांशी असलेल्या संबंधांचा वापर करून पोलिसांवर रुबाब झाडणाऱ्यांना लायसेन्स मागण्याआधी त्यांचे मोबाइल काढून घ्यावेत, अशी चर्चा सातारकरांमध्ये सुरू आहे.