सातारचे जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयास आयएसओ मानांकन प्राप्त 

By नितीन काळेल | Published: August 14, 2024 07:01 PM2024-08-14T19:01:39+5:302024-08-14T19:02:11+5:30

मानाचा तुरा : आयएसओ मानांकनात राज्यात कृषीत जिल्हास्तरावरील पहिला मान 

Satar District Superintendent Agriculture Office got ISO certification  | सातारचे जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयास आयएसओ मानांकन प्राप्त 

सातारचे जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयास आयएसओ मानांकन प्राप्त 

सातारा : सातारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयास १५० ९००१:२०१५ मानांकन प्राप्त झाले आहे. तसेच यामुळे आयएसओ मानांकनात कृषी विभागात राज्यात जिल्हास्तरावरील कार्यालयाचा मानही साताऱ्याला मिळाला आहे. यामुळे सातारा जिल्ह्याच्या शिरपेचातही मानाचा तुरा रोवला गेला आहे.

कृषी विभागाकडून देण्यात आलेली माहिती अशी की, हे मानांकन प्रामुख्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी उत्तम व्यवस्था करणे, कार्यालयातील अभिलेखांचे वर्गीकरण, अभिलेख कक्षात अभिलेखांची शाखानिहाय सुव्यवस्थित मांडणी करणे, कार्यालयाची साफसफाई, सुशोभीकरण, प्रत्येक मेजनिहाय सहा गढ्ढे पध्दत, प्रत्येक शाखेची मानक कार्यप्रणाली तयार करणे, शासनाकडील सूचनानुसार प्रसिध्द करावयाचे माहितीदर्शक फलक लावणे आदी बाबींच्या पूर्ततेच्या अधीन राहून केले जाते.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आयएसओ मानांकनासाठी आवश्यक बाबीची पूर्तता करण्यासाठी परिश्रम घेतले होते. तसेच या कार्यालयातील लेखाधिकारी शीतल करंजेकर यांनीही विशेष महत्त्वपूर्ण योगदान दिले. तर १५ ऑगस्टला पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिन ध्वजारोहण समारंभाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमावेळी याबाबतचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

दरम्यान, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या अधिनस्त सर्व कार्यालयांचेही याच पध्दतीने मानांकन मिळविण्यासाठी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी दिली.

Web Title: Satar District Superintendent Agriculture Office got ISO certification 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.