Satara: सोन्याच्या लिलावात गुंतवणुकीच्या आमिषाने २ कोटी २७ लाखांना गंडा, साताऱ्यातील घटना
By दत्ता यादव | Published: July 21, 2024 08:57 PM2024-07-21T20:57:46+5:302024-07-21T20:58:07+5:30
Satara News: सोन्याच्या लिलावामध्ये खरेदी-विक्रीत गुंतवणूक करण्यास सांगून एकाची तब्बल २ कोटी २७ लाख ९५ हजारांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- दत्ता यादव
सातारा - सोन्याच्या लिलावामध्ये खरेदी-विक्रीत गुंतवणूक करण्यास सांगून एकाची तब्बल २ कोटी २७ लाख ९५ हजारांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गिरीश पाटील, सचिन जाधव (रा. आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली), मयूर मारुती फडके (रा. जुना वारजे, कर्वेनगर, पुणे), अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
संतोष गुलाबराव शिंदे (वय ४७, मूळ रा. पाटखळ, ता. सातारा. सध्या रा. स्वरूप कॉलनी, सातारा) यांचे वरील तिघे संशयित मित्र आहेत. यातील मयूर फडके हा सोन्याच्या लिलावामध्ये खरेदी-विक्री करत होता. त्यामुळे त्याच्या मित्रांनी त्यांचा विश्वास संपादन करून मयूर फडके याच्याकडे पैसे गुंतविण्यास सांगितले. यानंतर संतोष शिंदे यांनी २८ एप्रिल २०२३ ते ९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत तिघा संशयितांकडे शिंदे यांनी आटीजीएस तसेच कॅश स्वरूपात एकूण २ कोटी २७ लाख ९५ हजार रुपये दिले.
मात्र, ना त्यांना सोने मिळाले ना त्यांना त्यांचे पैसे परत मिळाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संतोष शिंदे यांनी तिघा मित्रांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात दि. २० रोजी रात्री ९ वाजता गुन्हा दाखल केला. याबाबत पोलिस उपनिरीक्षक कुमार ढेरे हे अधिक तपास करीत आहेत.