सातारा : औंधमधून २७ पोती प्लास्टिक कचरा जमा, शिवसंकल्प प्रतिष्ठानचा उपक्रम, यमाई देवी मंदीर अन् श्री भवानी वस्तूसंग्रहालय परिसर चकाचक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 10:51 AM2018-01-27T10:51:44+5:302018-01-27T10:57:04+5:30
औंध (सातारा) : येथील शिवसंकल्प प्रतिष्ठानच्या सभासदांनी येथील मूळपीठ डोंगर परिसर व श्री भवानी वस्तू संग्रहालय परिसराची स्वच्छता करून सुमारे २७ पोती साठलेला प्लास्टीक कचरा जमा केला. श्री यमाईदेवी यात्रेनिमित्त मोठ्या प्रमाणात भाविक तसेच मूळपीठ डोंगरावरील श्री यमाईदेवी दर्शन आणि श्री भवानी संग्रहालय पाहण्यासाठी पर्यटकांची बारमाही गर्दी असते.
मूळपीठ डोंगरावरील दोन ते तीन किलोमीटर परिघातील क्षेत्रामध्ये प्लास्टिक पिशव्या व अन्य प्रकारचा कचरा साठला असतो. यामुळे निसर्गाची हानी होते.
परिसरही अस्वच्छ झाला आहे. हे लक्षात आल्यानंतर येथील शिवसंकल्प प्रतिष्ठानच्या सभासदांनी संपूर्ण डोंगर परिसर पिंजून काढून सुमारे सतावीस पोती प्लास्टिक कचरा जमा केला.
प्रतिष्ठानकडून औंध आणि परिसरात दरवर्षी स्वच्छता मोहीम राबवली जाते. औंध व परिसर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी यापुढील काळात जनजागृती मोहीम मोठ्या प्रमाणात राबविणार असल्याची माहिती अध्यक्ष निलेश खैरमोडे यांनी दिली.
दोन दिवस राबविण्यात आलेल्या मोहिमेत अभिमन्यू माने, विजय भोसले, सागर गोसावी, अंकुश शर्मा, श्रीपाद सुतार, शिवराज दंडवते, राहुल लाड, अवधूत गुरव, भारतीय सैन्य दलात सेवा बजावत असलेले अभिजित जाधव व दिपक जाधव, सूरज सावंत तसेच स्वयंसेवकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. यासामाजिक उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत असून यामुळे मूळपीठ डोंगर परिसर स्वच्छ झाला आहे.