Satara: बोगस कागदपत्राद्वारे काढलं तब्बल एक कोटीचे कर्ज, बँक ऑफ महाराष्ट्राची फसवणूक; ४९ जणांवर गुन्हा
By दत्ता यादव | Published: April 5, 2023 02:26 PM2023-04-05T14:26:49+5:302023-04-05T14:37:17+5:30
अन् तेव्हा उघडकीस आली बोगसगिरी
सातारा : सातबारा उतारा, तलाठ्याची सही, शिक्का सारं काही बोगस बनवून ही कागदपत्रे खरी असल्याचे भासवून तब्बल १ कोटीहून अधिक रकमेचं कर्ज काढलं गेलं. मात्र, जेव्हा कर्जाच्या परतफेडची वेळ आली तेव्हा ही बोगसगिरी उघडकीस आली. यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र शाखेने आपली फसवणूक झाल्याची तक्रार मेढा पोलिस ठाण्यात नोंदवली. यावरून पोलिसांनी जावळील तालुक्यातील तब्बल ४९ जणांवर मेढा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
सचिन उत्तमराव शिंदे, विक्रांत बापूसाहेब शिंदे, बाळासाहेब जगन्नाथ अमराळे, सचिन लक्ष्मण जाधव, सचिन बापूसाहेब शिंदे, लक्ष्मण सोमन्ना शहाबाद (सर्व रा. आखाडे, ता. जावळी), प्रवीण शिवाजी यादव (रा. आंबेघर, ता. जावळी), कांता चंद्रकांत बेलोशे (रा. बेलोशे, ता. जावळी), महादेव चंदरराव मदने, आदिनाथ यशवंत लोहार, संगम सूर्यकांत जरे, छाया दीपक जाधव (रा. हुमगाव, ता. जावळी, जि. सातारा), संतोष शिवाजी पवार, संतोष बाळासाहेब कदम, सयाजी बाळासाहेब कदम, जयश्री सयाजी कदम (सर्व रा. कुडाळ, ता. जावळी),
शिवाजी शंकर करंदर, श्रीराम शंकर करंदकर, मच्छिंद्र शंकर करंदकर (रा. रानगेघर, ता. जावळी), अक्षय भाऊसो दुर्गावळे (रा. सनपाने, ता. जावळी),
दिगंबर विठ्ठल गोळे (रा. सनपाने, ता. जावळी) यांच्यासह ४९ जणांचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे. याबाबत जावळी तालुक्यातील कुडाळ येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेचे शाखाधिकारी सरोजकुमार गणेश भगत (रा. कुडाळा, ता. जावळी) यांनी मेढा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत मेढा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वरील संशयितांनी बॅंक ऑफ महाराष्ट्र कुडाळच्या शाखेत कर्ज घेताना बोगस सातबारा उतारे तयार केले. त्यावर तलाठ्याची खोटी सही व शिक्का मारून हे उतारे खरे आहेत, असे सांगितले. या कागदपत्रावरून बॅंकेने प्रत्येकाला कर्ज दिले. मात्र, या कर्जाची परफेड केली नाही. त्यावेळी बॅंकेने या सर्वांच्या कादपत्रांची पुन्हा शहानिशा केली असता सर्व कागदपत्रे बनावट असल्याचे समोर आले.
यानंतर बॅंकेच्या वतीने मेढा येथील न्यायालयात फाैजदारी खटला दाखल करण्यात आला. त्यानुसार न्यायालयाने संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. यानंतर बॅंक ऑफ महाराष्ट्र कुडाळ शाखेचे शाखाधिकारी सरोजकुमार भगत यांनी मेढा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या सर्वांनी मिळून तब्बल एक कोटीहून अधिक रक्कम कर्ज घेतल्याचे तपासी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी सांगितले. या प्रकरणाच्या तपासासाठी आता गुन्हा दाखल झालेल्या ४९ कर्जदारांना चाैकशीसाठी बोलावून अधिक माहिती घेतली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.