सातारा दुर्घटनेतील डॉल्बी मात्र निसटली !
By admin | Published: September 11, 2014 09:59 PM2014-09-11T21:59:58+5:302014-09-11T23:16:26+5:30
एकच मशीन : पोलीस म्हणतात, आम्ही कुठे-कुठे धावाधाव करायची?
सातारा : आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या २५ डॉल्बींची यादी पोलिसांतर्फे जाहीर करण्यात आली असली, तरी अनेक सिस्टिम कारवाईतून निसटल्याचे स्पष्ट झाले असून, त्यातील अनेक डॉल्बी सिस्टिम भिंत कोसळण्याच्या घटनेवेळी राजपथावर दणाणत होत्या. तथापि, एकच मशीन घेऊन आम्ही कुठे-कुठे जायचे, असा प्रश्न उपस्थित करून सर्वच डॉल्बी कारवाईच्या यादीत नसल्याच्या चर्चेला पोलिसांनी पुष्टी दिली.
गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी राजपथावर जीर्ण झालेल्या इमारतीची भिंत कोसळून तीन जणांना जीव गमवावा लागला. या घटनेनंतर डॉल्बी चर्चेत आली आहे. संबंधित इमारतीच्या मालकांविरुद्ध पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे; मात्र या घटनेस डॉल्बीही काही अंशी जबाबदार असल्याचे पुराव्यानिशी शाबीत करणे तांत्रिकदृष्ट्या अवघड असल्याने पोलिसांनी डॉल्बीबाबत मौन बाळगले आहे. दरम्यान, घटनेवेळी राजपथावर एकंदर आठ ते दहा डॉल्बी दणाणत होत्या, असे राजपथावरील रहिवाशांनी ‘लोकमत’ला सांगितले होते. तथापि, त्यातील काही डॉल्बी मोठ्या आवाजात दणाणत असल्याची चर्चा संपूर्ण शहरभर असताना, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ज्या डॉल्बींवर कारवाईची शिफारस जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे करण्यात येत आहे, त्या यादीतून काही डॉल्बी निसटल्याचे दिसत आहे.
यासंदर्भात अधिक माहिती घेतली असता, शहर पोलीस ठाण्याकडे एकच ध्वनिमापन यंत्र उपलब्ध होते आणि मिरवणुकीदरम्यान त्याच्याच साह्याने सर्व डॉल्बी सिस्टिमचे ध्वनिमापन करावे लागत होते, अशी माहिती देण्यात आली. म्हणजेच, घटना घडली त्या ठिकाणी आणि नेमक्या त्यावेळी पोलिसांचे ध्वनिमापन यंत्र पोचलेच नसावे, असाच निष्कर्ष निघतो. प्रत्यक्षदर्शींनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळाच्या आसपास दणाणणाऱ्या डॉल्बींची कंपने भयावह होती. मात्र, पोलिसांनी तयार केलेल्या यादीतून अशा अनेक सिस्टिम निसटल्या असून, ध्वनिमापन यंत्रे अपुरी पडली असल्याचे समोर आले आहे. (प्रतिनिधी)
चौदा प्रस्ताव एसपींना सादर
आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकूण २५ मंडळांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यांच्यावरील कारवाईचे प्रस्ताव पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडे सादर करण्यास सुरुवात झाली आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत असे सुमारे १४ प्रस्ताव एसपींकडे पाठविण्यात आले होते.