सातारा : जिल्ह्यातील १९९ खासगी विहिरींचे अधिग्रहण होणार, पाणी टंचाईची चाहूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 01:26 PM2018-03-02T13:26:48+5:302018-03-02T13:26:48+5:30
सातारा सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढत असून, पाण्याची भीषण टंचाई होण्याची शक्यता असल्याने जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने जिल्ह्यातील १९९ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्याचा निर्णय घेतला असून, या सर्व विहिरी तीन महिने शासनाच्या ताब्यात घेण्यात येणार आहेत.
सातारा : सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढत असून, पाण्याची भीषण टंचाई होण्याची शक्यता असल्याने जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने जिल्ह्यातील १९९ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्याचा निर्णय घेतला असून, या सर्व विहिरी तीन महिने शासनाच्या ताब्यात घेण्यात येणार आहेत.
सातारा जिल्ह्यात दरवर्षी पाणीटंचाईचा आढावा घेतला जातो. त्याप्रमाणे यंदाही जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने हा आढावा घेतला आहे. अकरा तालुक्यांमधील बहुतांश गावांमध्ये पाण्याची टंचाई भासणार आहे. त्यामुळे आत्तापासून उपाययोजना करण्यासाठी जिल्हा परिषदेने प्रयत्न सुरू केले आहेत.
जिल्ह्यात १९९ विहिरींचे अधिग्रहण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तीन ते चार महिने या विहिरी शासनाच्या ताब्यात राहणार आहेत. ज्या गावांना पाणी कमी आहे त्या गावांना अधिग्रहण केलेल्या विहिरीतून पाणीपुरवठा केला जाणार आहे.
दरम्यान, तोंडे पाहूनच विहिरी अधिग्रहण करण्यात आल्याचा आरोप अनेक शेतकऱ्यांनी केला असून, यासंदर्भात शेतकऱ्यांनी अशा प्रकारची निवेदनही जिल्हा परिषदेमध्ये दिली आहेत. ज्यांच्या विहिरींना खरोखरच जास्त पाणी आहे. शिवाय उन्हाळी पिके घेतली जात नाहीत, अशा काही विहिरी आहेत. त्यांना या अधिग्रहणमधून डावलण्यात आल्याचा आरोपही काही शेतकऱ्यांनी केला आहे.