सातारा : प्र नंतर शासकीयही पडण्याच्या बेतात, प्रशासकीय इमारतीकडे दुर्लक्ष, स्वच्छतेचे तीन-तेरा; पाण्याचाही तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 06:35 PM2017-12-28T18:35:50+5:302017-12-28T18:40:38+5:30
सातारा येथील प्रशासकीय इमारतीकडे अक्षम्य दुर्लक्ष केले असल्याचे समोर येत असून, या टोलेजंग इमारतीच्या नावातील ह्यप्रह्ण पडून केवळ शासकीय हे अक्षर उरले आहे. स्टीलमधील ही अक्षरे गंजून पडत आहेत, आता उरलेले शासकीय ही अक्षरेही पडण्याच्या बेतात आहेत.
सातारा : येथील प्रशासकीय इमारतीकडे अक्षम्य दुर्लक्ष केले असल्याचे समोर येत असून, या टोलेजंग इमारतीच्या नावातील प्र पडून केवळ शासकीय हे अक्षर उरले आहे. स्टीलमधील ही अक्षरे गंजून पडत आहेत, आता उरलेले शासकीय ही अक्षरेही पडण्याच्या बेतात आहेत.
इमारतीला सुरुवातीच्या काळात केलेली रंगरंगोटी आता फिकी पडलेली आहे. त्यातच इमारतीच्या दर्शनी भागात लावलेली स्टीलची अक्षरेही गंजून पडू लागली आहेत. प्रशासकीय इमारत असे या दर्शनी भागाच्या इमारतीवर लिहिण्यात आले होते. यातील प्र हे अक्षर केव्हाच पडून गेले आहे.
उरलेली शासकीय ही अक्षरेही गंजू लागल्याचे दिसते. त्याकडे दुर्लक्ष केले गेल्यास ती अक्षरेही पडून जाण्याची शक्यता असून, भविष्यात ही इमारत शासकीय की खासगी? हे ओळखणेही अवघड होण्याची दाट शक्यता आहे.
ही इमारत जिल्हाधिकाऱ्यांसह सर्वांच्याच दुर्लक्षाचे धनी बनले आहे. इमारतीतील लिफ्ट कधी सुरू होते, तर अनेकदा ती बंदस्थितीत पाहायला मिळते. चार मजल्यांच्या इमारतीवर विविध शासकीय कार्यालये आहेत. साहजिकच कामानिमित्त जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लोकांना पायऱ्या चढूनच वर जावे लागते.
अपंगांचे हाल होताना पाहायला मिळतात. सध्याच्या घडीला इमारतीत अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. पाण्याची वारंवार टंचाई होत असल्याने स्वच्छतागृहे अस्वच्छ राहून दुर्गंधी पसरताना पाहायला मिळते.
जिल्हा रोजगार कार्यालय, जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय, आत्मा, जिल्हा माहिती अधिकारी, सीआयडी, जिल्हा वाहतूक शाखा, जिल्हा उपनिबंधक कार्यालय, महिला व बालकल्याण विभाग अशी शासकीय कार्यालये या इमारतीत आहेत. शेकडो लोक कामानिमित्त कार्यालयात येत असतात. इमारतीचा परिसरही अस्वच्छ बनला आहे.
सैन्य भरतीनंतर अस्वच्छतेचे साम्राज्य
सातारा शहरात पोलिस परेड मैदानावर नुकतीच भरती प्रक्रिया पार पडली. या भरतीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील हजारो युवक आले होते. त्यांनी आणलेल्या साहित्याच्या पिशव्या, पाण्याच्या बाटल्या, यांचा खच या इमारतीत पडलेला दिसतो. त्यामुळे येथे स्वच्छता मोहीम राबविण्याची गरज आहे.