सातारा : पिंपोडे बुद्रुक परिसरात ज्वारी पिकांनी शिवारं फुलली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 01:47 PM2018-12-13T13:47:38+5:302018-12-13T13:49:43+5:30
तालुक्यातील उत्तरेकडील परिसरात यंदा ज्वारीचे पीक जोमदार असून, परिसरातील शिवारं जणू ज्वारीच्या पिकाने बहरल्याचे चित्र परिसरात पाहावयास मिळत आहे.
पिंपोडे बुद्रुक : तालुक्यातील उत्तरेकडील परिसरात यंदा ज्वारीचे पीक जोमदार असून, परिसरातील शिवारं जणू ज्वारीच्या पिकाने बहरल्याचे चित्र परिसरात पाहावयास मिळत आहे.
दुष्काळी भाग म्हणून ओळखले जाणाऱ्या तालुक्यातील उत्तरेकडील परिसरात रब्बी हंगामात प्रामुख्याने ज्वारी, गहू, हरभरा या पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.
चालूवर्षी परिसरात पावसाने हुलकावणी दिल्याने परिसरात तरकारी व आदी नगदी पिकांखालील क्षेत्रात घट झाली असून, त्याचा परिणाम म्हणून परिसरात काहीअंशी ज्वारीच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली आहे.
अपुऱ्या पर्जन्यमानामुळे परिसरात शेतीच्या पाण्याची स्थिती गंभीर असली तरी ज्वारीच्या पेरणीपासून आजपर्यंत परिसरात योग्यवेळी व योग्य प्रमाणात पावसाने साथ दिल्याने परिसरातील ज्वारीचे पीक जोमदार आहे. परिसरात सध्या ज्वारीचे पीक वाढीच्या अवस्थेत असून, परिसरात निर्माण होणारे थंड वातावरण ज्वारीच्या वाढीसाठी पोषक आहे.
दरम्यान, परिसरात पडणारी कडाक्याची थंडी रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा, गहू या पिकांसाठी पोषक असून, अनुकूल वातावरणीय परिस्थितीमुळे परिसरातील शेतकरी उच्चांकी उत्पादनाबाबत आशावादी असल्याचे पाहावयास मिळत आहे.
परिसरात ज्वारीचे पीक समाधानकारक असले तरी आगामी काळात कणसातील दाणे भरण्याच्या अवस्थेत ज्वारीला पाण्याची गरज भासणार आहे.
- जयदीप धुमाळ