साताऱ्याची बाजीराव विहीर झळकली पोस्टकार्डवर!, महाराष्ट्रातील आठ ऐतिहासिक विहिरींचा समावेश

By सचिन काकडे | Published: October 12, 2023 07:02 PM2023-10-12T19:02:13+5:302023-10-12T19:02:37+5:30

साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला

Satara Bajirao Well on a postcard, including eight historic wells in Maharashtra | साताऱ्याची बाजीराव विहीर झळकली पोस्टकार्डवर!, महाराष्ट्रातील आठ ऐतिहासिक विहिरींचा समावेश

साताऱ्याची बाजीराव विहीर झळकली पोस्टकार्डवर!, महाराष्ट्रातील आठ ऐतिहासिक विहिरींचा समावेश

सातारा : साताऱ्यातील जलमंदिर परिसरात असलेल्या व ऐतिहासिक वारसा लाभलेल्या ‘बाजीराव विहिरी’चे छायाचित्र पोस्टकार्डवर झळकल्याने साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. राष्ट्रीय पोस्ट दिनाचे औचित्य साधून केंद्रीय डाकघर विभागाने स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या विहिरीचा अनोखा सन्मान केला.

छत्रपती राजाराम महाराज यांनी स्वराज्याची राजधानी रायगडावरून किल्ले अजिंक्यतारा येथे स्थापन केली. चौथ्या राजधानीचा मान मिळालेल्या या किल्ल्यावरूनच छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्यकाळात अटकेपार झेंडा फडकवला गेला. त्यांच्याच काळात सध्याच्या जलमंदिर पॅलेसचा भाग असणारी बाजीराव विहीर बांधण्यात आली. केंद्रीय डाक विभागाने राष्ट्रीय पोस्ट दिनानिमित्त भारतातील उल्लेखनीय विहिरींचे निरीक्षण केले. त्यातील बारव, बावडी, पुष्करणी, पोखरण, पायविहीर, घोडेबाव, पोखरबाव अशा वेगवेगळ्या विहिरींतून महाराष्ट्रातील आठ विहिरींच्या छायाचित्राचा समावेश पोस्टाच्या पुस्तिकेत केला आहे. 

त्यामध्ये नाशिक, अमरावती, पुणे, सातारा या जिल्ह्यांतील प्रत्येकी एका तर परभणी जिल्ह्यातील चार अशा एकूण आठ विहिरींचा समावेश आहे. साताराच्या बाजीराव विहिरीचे छायाचित्र पोस्टकार्डवर प्रसिद्ध झाल्याने सातारा शहराच्या दृष्टीने ही एक अभिमानास्पद बाब ठरली आहे. बाजीराव विहिरीचे छायाचित्र प्रसिद्ध होण्याच्या संपूर्ण प्रक्रियेत महाराष्ट्र बारव संवर्धन समितीचे संस्थापक आणि समन्वयक रोहन काळे, राजेश कानिम, शैलेश करंदीकर, धनंजय अवसरे, हेमंत लंगडे यांनी बहुमोल सहकार्य केले आहे. राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा वारसा संवर्धन ग्रुप समितीच्या माध्यमातून बाजीराव विहिरीची जपणूक केली जात आहे.

विहिरीची अशी आहेत वैशिष्ट्य..

ही विहीर १०० फूट खोल असून, तिचा आकार महादेवाच्या पिंडीसारखा आहे. नऊ कमानी असलेल्या या विहिरीत छत्रपती शाहू महाराज यांचे राजचिन्हांसह शिल्प कोरण्यात आलेले आहे. विहिरीत आजही जिवंत पाण्याचे झरे असून, पूर्वी कास योजना किंवा खापरी योजना अस्तित्वात नव्हती, त्यावेळी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या याच विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरण्यात येत होते.

साताऱ्यातील बाजीराव विहिरीचे छायाचित्र पोस्टकार्डवर झळकले असून, सातारकरांसाठी ही अभिमानास्पद बाब आहे. एमआयटी स्कूल ऑफ आर्किटक्चर पुणे, रोहन काळे, राजेश कानिक यांच्या परिश्रमपूर्वक योगदानाचे निश्चितच कौतुक आहे-  उदयनराजे भोसले, खासदार

Web Title: Satara Bajirao Well on a postcard, including eight historic wells in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.