Satara District Bank Election : खरे किंग ठरले...उदयनराजे भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2021 01:56 PM2021-11-23T13:56:03+5:302021-11-23T13:57:01+5:30

दीपक शिंदे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी रविवारी मोठ्या उत्साहात आणि जोशात मतदान झाले. आज मतमोजणी झाली आणि सर्व चित्र ...

Satara Bank election True King Udayan Raje Bhosale | Satara District Bank Election : खरे किंग ठरले...उदयनराजे भोसले

Satara District Bank Election : खरे किंग ठरले...उदयनराजे भोसले

Next

दीपक शिंदे
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी रविवारी मोठ्या उत्साहात आणि जोशात मतदान झाले. आज मतमोजणी झाली आणि सर्व चित्र स्पष्ट झाले. अखेर जिल्हा बँकेवर राष्ट्रवादी पुरस्कृत सहकार पॅनेलची सत्ता आली. बँकेच्या या निवडणुकीत अनेकांनी गणिते जुळवून आणली. कधी आकडा कमी पडला तर कधी वाढता असल्याने अल्पकालावधीसाठी समाधानही झाले. पण, बँकेचा हिशोब व्यवस्थित झाला पाहिजे. अन्यथा, ऑडिटमध्ये चुका निघण्याची शक्यता अधिक असते. ज्यांचा हिशोब जुळला ते बँकेत पास झाले आणि चुकला ते नापास. निवडणुकीत हारजीत होणारच, पण एकमेकांचे हिशोब कसे चुकते झाले तेही स्पष्ट होणार

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत पहिल्या टप्प्यात आमदार मकरंद पाटील, राजेंद्र राजपुरे आणि शिवरुपराजे खर्डेकर हे बिनविरोध निवडून आले. या निवडणुकीच्या निमित्ताने कोणत्या नेत्याची कोणत्या मतदारसंघावर चांगली पकड निर्माण झाली याचा अंदाज आला. वाई मतदारसंघातील सर्व जागा बिनविरोध करण्यात आमदार मकरंद पाटील यांना यश आले. त्यांनी अत्यंत संयमी खेळी करत आपल्या मतदारसंघातील जागा बिनविरोध करून घेतल्या. वाई-खंडाळा, महाबळेश्वर या जिल्ह्यातील सर्वात लांबीने मोठ्या असलेल्या मतदारासंघात त्यामुळे काहीच गडबड झाली नाही. विरोधकांनाही शांत करण्याचे काम या ठिकाणी झाले. त्यामुळे भविष्यात विरोध होणार हे गृहीत धरले तरी सध्याच्या स्थिती मकरंद पाटील यांनी बाजी मारली. विराज शिंदे मकरंद पाटील यांच्यापुढे काही अडचणी निर्माण करतील अशी शक्यता होती. मात्र, त्यांनी आपला हातचाच वजा केल्याने मकरंद पाटील यांचे गणित सोपे झाले. प्रत्येक तालुक्यात बँकेसाठी राजकारण झाले. बँकेतूनच पुन्हा जिल्ह्याचे राजकारण चालणार त्यामुळे आता कितीही सांगितले बँकेत राजकारण नाही तरी विश्वास कसा ठेवायचा.

जावळीत चमत्काराचीच शक्यता...

सातारा आणि जावळी मतदारासंघात मोठी चुरशीची लढत झाली. शशिकांत शिंदे यांनी कोरेगावऐवजी जावळीत लक्ष घातल्याने नाराज झालेल्या अनेकांनी जावळीत त्यांचे गणित चुकविण्याचाच निर्णय घेतला. कधीतरी जुळेल आणि गणित सुटेल यासाठी गेले पंधरा दिवस ठाण मांडून बसलेल्या शशिकांत शिंदे यांच्या हाती फारसे काही लागले नाही. त्यांची मदार रांजणे यांच्यावरच राहिली आणि अखेर सर्व ज्येष्ठ नेत्यांचेही आणि शरद पवारांच्या सूचनेनंतरही रांजणे ऐकलेच नाहीत म्हणे. ज्या पक्षात आहेत असे म्हणतात... त्याच पक्षाच्या नेत्यांचा आदेश धुडकावला. त्यामुळे शशिकांत शिंदेंच्या बाबतीत केवळ चमत्कारच घडू शकतो. मात्र अखेर शशिकांत शिंदे यांचा केवळ १ मताने पराभव झाला.

खरे किंग ठरले...उदयनराजे भोसले

खासदार उदयनराजे भोसले यांना सोबत घेऊन एक पॅनल तयार करण्याचे काहींचे नियोजन होते. पण, उदयनराजे भोसले काही कोणत्याच पॅनेलमध्ये जाण्याच्या तयारीत नव्हते. त्यांना काही आठ दहा कार्यकर्ते घेऊन बँकेत जायचे नव्हते. आपल्यापुरते झाले तरी पुरे, एवढीच त्यांची माफक अपेक्षा होती. त्यामुळे त्यांच्या इतर कार्यकर्त्यांनी माघार घेतली आणि ते बिनविरोध झाले. कोणाला वाईट वाटायला नको म्हणून त्यांनी लगेचच बाहेरगावी जाण्याचा निर्णय घेतला.

प्रभाकर घार्गेंच्या मदतीला जुने सहकारी

राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यानंतर प्रभाकर घार्गे यांनी स्वतंत्रपणे अर्ज भरण्याचा निर्णय घेतला. पत्नीचा महिला राखीवमधील अर्ज काढून घेतला आणि राष्ट्रवादीच्या मदतीशिवाय जिंकून येऊ शकतो असा आत्मविश्वास बाळगत निवडणुकीला सामोरे गेले. रणजितसिंह देशमुख आणि माजी आमदार दिलीप येळगावकर यांनी त्यांना मदत केली. अडचणीच्या काळात राखून ठेवलेले हे हातचे मिळाल्याने प्रभाकर घार्गेंचे गणितही सोपे झाले.

गोरे नेमके कोणाच्या मदतीला...

आमदार जयकुमार गोरे आणि खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी आश्चर्यकारकरीत्या माघार घेतली. निवडणुकीत पात्र होण्यासाठी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावणाऱ्या या जोडगोळीने निवडणुकीतूनच माघार घेतल्याचे गूढ अनाकलनीय आहे. या निवडणुकीत मतदानादिवशी त्यांचा अधिक घरोबा हा रामराजे नाईक निंबाळकरांशी झाल्याने जयकुमार गोरे नक्की कोणाच्या बाजूने आहेत हे देखील समजत नाही. अनेकांनी भावाला मदत होईल यासाठी माघार घेतली असे म्हटले होते. पण, रविवारचा नजारा काही औरच दिसला.

कोरेगावचा गुलदस्ता कोणाला....

सुनील खत्री आणि शिवाजीराव महाडिक यांच्यात झालेली लढत ही उमेदवारांपेक्षा नेत्यांच्या राजी आणि नाराजीनेच अधिक गाजली. सुनील माने यांचे जिल्हा परिषदेतील तिकीट कोणी कापले याची नाराजी तर शशिकांत शिंदे यांनी सहमती कशी दिली याचीही नाराजी राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी त्रासदायक ठरत आहे. तरीही या अटीतटीत कोरेगावचा गुलदस्ता कोणाला मिळणार हे आज स्पष्ट होईल. दोन्ही मतदारसंघांमध्ये ईश्वर चिठ्ठी काढली. शिवसेनेचे शेखर गोरे आणि सुनील खत्री यांना या चिठ्ठीने साथ दिली आणि ते विजयी ठरले.

Web Title: Satara Bank election True King Udayan Raje Bhosale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.