साताऱ्याचा ज्येष्ठ नागरिक संघ बनला २६ वर्षांचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 10:45 PM2018-09-30T22:45:03+5:302018-09-30T22:45:06+5:30
नितीन काळेल ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : ज्येष्ठांच्या समस्या सोडविणे, आनंदी जीवन जगणे व हितगुज करण्यासाठी सातारा जिल्ह्यात प्रथम स्थापन झालेला सातारा ज्येष्ठ नागरिक संघ आता २६ वर्षांचा झाला आहे. पुण्यातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभांमधून मिळालेल्या प्रेरणेतून हा संघ स्थापन झाला. आतापर्यंत या संघाने विविध कार्यक्रम घेऊन ज्येष्ठांच्या जीवनात आनंदाचे क्षण निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
वयाची साठी ओलांडली म्हणजे ज्येष्ठ झाले, असे म्हटले जाते. नोकरीतील निवृत्तीचे वयही ५८, ६० असते. वर्षानुवर्षे नोकरी केल्यानंतर निवृत्तीनंतरचे दिवस काढणे अवघड होऊन जाते. त्यामुळे कोणी व्यवसायात गुंतवून घेतो तर कोणी शेतीकडे लक्ष देतो.
अनेकजण उर्वरित आयुष्य आनंदाने जगायचे म्हणून पर्यटन, सहलीवर जातात; पण या सर्व ज्येष्ठांना एकत्र आणण्याची किमया होते फक्त ज्येष्ठ नागरिक संघातच. या संघाच्या माध्यामातून महिन्याला बैठकीचे आयोजन करण्यात येते. एकमेकांशी हितगुज करून जुन्या आठवणींनाही उजाळा दिला जातो. अशाच या प्रेरणेमधून सातारचा ज्येष्ठ नागरिक संघ २ आॅक्टोबर १९९२ रोजी स्थापन झाला. हा संघ स्थापन करण्यामागे राजमाता सुमित्राराजे भोसले यांची प्रेरणाही होती.
सातारा ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन होण्यामागे खूप रंजक गोष्ट आहेत. साताºयातील डॉ. बाळासाहेब माजगावकर व माधवराव धुमाळ गुरुजी १९९० पासून ज्येष्ठ नागरिक संघाचे काही कार्यकर्ते माहितीचे असल्याने पुण्याला जात होते. तेथील ज्येष्ठांच्या सभांना त्यांची हजेरी असायची. या सभांमधून ऐकलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांकडे दोघेही आकृष्ट झाले. त्यानंतर दोघांनी साताºयात ही चळवळ सुरू करण्याचे ठरविले. १९९२ च्या सप्टेंबर महिन्यात माधवराव धुमाळ यांनी साताºयात ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन करण्याची कल्पनाच नव्हे तर प्रस्तावच डॉ. माजगावकर यांच्यासमोर ठेवला. त्यानंतर २ आॅक्टोबर १९९२ हा गांधी जयंतीचा दिवस ज्येष्ठ नागरिक संघाच्या स्थापनेसाठी निश्चित करण्यात आला व समर्थ सदनमध्ये पहिली सभा घेण्यात आली.
या पहिल्या सभेला धुमाळ गुरुजी, डॉ. माजगावकर, मदनलाल परदेशी, केशवराव साठे, डॉ. मंगला माजगावकर, शैलजा पाठक, शामराव पानसे, सुमती आगाशे आदी उपस्थित होते. या संघाने आतापर्यंत विविध कार्यक्रम घेतले आहेत. त्यापैकी एक म्हणजे १९९५ मध्ये वैवाहिक जीवनाला ५० वर्षे पूर्ण झालेल्या दाम्पत्यांचा सत्कार करण्यात आला होता. या कार्यक्रमाला अध्यक्षा म्हणून राजमाता सुमित्राराजे भोसले उपस्थित होत्या. आबासाहेब पार्लेकर, मुकुंदराव किर्लोस्कर, शांताबाई किर्लोस्कर, आमदार अभयसिंहराजे भोसले आदी दिग्गज मंडळींची उपस्थिती होती.
सध्या या संघाचे अध्यक्ष म्हणून रामभाऊ जाधव काम पाहत आहेत. उपाध्यक्ष सुधीर धुमाळ, विद्या आगाशे असून, कार्याध्यक्ष वाय. के. कुलकर्णी, सचिव वैदेही देव, सहसचिव मधुकर बाजी, सूर्यकांत जाधव, खजिनदार सुरेश कुलकर्णी आहेत. संघाचे आजही काम आदर्शवत असेच आहे.
घरोघरी पायी जाऊन सभासद नोंदणी...
साताºयात ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन झाला तेव्हा १५ रुपये वार्षिक वर्गणी होती; त्यासाठी घरोघर जाऊन सभासदांची नोंदणी करण्यात आली. मदनलाल परदेशी, शैलजा पाठक, डॉ. मंगला माजगावकर, अप्पासाहेब तारळेकर, रुस्तुम शेख, भाऊसाहेब भुरके, भाई देवी, नारायणराव कर्णिक, विनायकराव दाते, गोपाळराव केळकर, प्र. धु. इनामदार, डॉ. खुटाळे, गो. रा. डिंगरे, मालतीबाई कुलकर्णी, अण्णा नाईक आदी मंडळी कार्यकारी मंडळामध्ये होती.
संघासाठी अनेकांचे योगदान लाभले...
राजमाता सुमित्राराजे भोसले यांच्या प्रेरणेने आणि संस्थापक कार्याध्यक्ष दिवंगत माधवराव धुमाळ तसेच डॉ. बाळासाहेब माजगावकर,
अप्पासाहेब तारळेकर, ज्येष्ठ पत्रकार पा. वि. खांडेकर, रुस्तम शेख, राजाभाऊ शहाणे, भाऊसाहेब भुरके, चंद्रकांत गिते, भाई देवी, वि. सा. भोईटे गुरुजी, शैलजा पाठक, मदनलाल परदेशी, माधवी लिमये आदींच्या
प्रयत्नातून या संघाची स्थापना झाली आहे. यामधील अनेकांचे निधन
झाले आहे.