साताऱ्याची एसटी बनली आता कॅशलेस !
By admin | Published: February 15, 2017 10:42 PM2017-02-15T22:42:31+5:302017-02-15T22:42:31+5:30
दोन स्वाईप मशीन दाखल : विनाथांबा अन् आरक्षण खिडकीत पाकिटाला हात न लावताही मिळणार तिकीट
सातारा : नोटाबंदीच्या निर्णयानंतर दिल्लीपासून गल्लीपर्यंत खऱ्या अर्थाने अर्थक्रांती घडली. सर्वसामान्य नागरिकही पेटीएम, स्वाईप यंत्रांद्वारेच अनेक दैनंदिन व्यवहार करू लागले. या बदलाच्या दिशेनेच एसटीनेही एक पाऊल टाकले आहे. सातारा आगारात मंगळवारपासून दोन स्वाईप मशीन दाखल झाल्या आहेत.
साताऱ्यातून पुणे, मुंबईला दररोज हजारो लोक जात असतात. त्याठिकाणी मोठा खर्च होतो. मात्र, तिकिटातच निम्मे पैसे खर्च झाल्यामुळे त्याठिकाणी गेल्यास एटीएम मशीन शोधावे लागतात. तेथे रांगेत वेळ गेला तर कामे खोळंबतात. त्यामुळे अनेक व्यापारी रोख रक्कम खिशात नेतात. मोठी रोकड जवळ बाळगणेही धोक्याचे ठरते. एसटीने कॅशलेस व्यवहार आणल्याने बऱ्यापैकी दिलासा मिळाला आहे.
राज्य परिवहन महामंडळाने नेहमीच नव्या बदलांना आत्मसात केले. एसटीच्या स्थापनेपासून आंतरबाह्य रचनेत वेळोवेळी बदल केले. खासगी प्रवासी वाहतुकीकडे चाललेल्या प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी आकर्षक आसन व्यवस्था, स्वच्छता राखण्याकडे कटाक्ष अन् प्रवाशांना अभिवादन, असे उपक्रम राबविले होते. त्यातील काहींना कर्मचाऱ्यांकडूनच फारसा प्रतिसाद मिळाला नसला तरी नव्या बदलांना आत्मसात करण्याचे कमी केले नाही.
व्यवहारातून जुन्या नोटा हद्दपार झाल्यानंतर बाजारपेठेत काही काळासाठी आर्थिक मंदी निर्माण झाली. लोकांकडे पैसाच नसल्याने केंद्र सरकारने नवा पर्याय समोर दिला. पेटीएम, स्वाईप कार्ड, आॅनलाईन पेमेंट प्रणाली वापरण्याचा सल्ला दिला जाऊ लागला. ही घटना सर्वसामान्यांच्या जीवनासाठी कलाटणी देणारी ठरली. यातून सर्वसामान्यांची एसटीही सुटलेली नाही.
असंख्य तरुण सातारकर उच्च शिक्षण, नोकरीच्या निमित्ताने पुणे-मुंबईत स्थायिक झाले आहेत. नोटाबंदीच्या निर्णयानंतर स्वाईप कार्ड, पेटीएम किंवा ई-पेमेंटचा वापर करण्याकडे त्यांचा कल सर्वाधिक आहे.
त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागात सातारा-पुणे, सातारा-मुंबई विनाथांबा या सुविधा म्हणजे अर्थवाहिनी ठरल्या आहेत. त्यामुळेच या सेवेत नवीन, निमआराम गाड्यांचा वापर मोठ्या संख्येने केला जाऊ लागला. या सेवेचा सर्वाधिक लाभ उच्चशिक्षित मंडळींकडून केला जातो. हाच विचार करून या सेवेत आणखी एका आधुनिक सुविधेचा समावेश केला आहे.
सातारा विभागाने दोन स्वाईप मशीन खरेदी केले आहेत. त्यातील एक विनाथांबासाठी तर दुसरे यंत्र संगणकीकृत आरक्षण खिडकीत कार्यान्वित केले आहेत. या योजनेचा प्रारंभ विभागीय लेखाधिकारी दीपाली कुलकर्णी, वरिष्ठ आगार व्यवस्थापक नीलम गिरी यांच्या हस्ते करण्यात आला. (प्रतिनिधी)