सातारा ठरला ‘सवतीचा लेक’

By Admin | Published: June 21, 2015 11:24 PM2015-06-21T23:24:23+5:302015-06-22T00:11:48+5:30

शाहूनगरवासी संतप्त : वैद्यकीय महाविद्यालय रद्द करण्याच्या निर्णयावर सर्व स्तरांतून तिखट प्रतिक्रिया

Satara becomes the 'Lake of Sawati' | सातारा ठरला ‘सवतीचा लेक’

सातारा ठरला ‘सवतीचा लेक’

googlenewsNext

सातारा : बड्या उद्योगगृहांपासून शैक्षणिक संस्थांपर्यंत साताऱ्याला काही मिळूच द्यायचे नाही, हा खेळ वर्षानुवर्षे चाललेला असताना आता येथे होऊ घातलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशामुळे अधांतरीच राहिले आहे. त्यामुळे सातारकरांमध्ये तीव्र असंतोष असून, सर्वपक्षीय नेते आणि सर्वच स्तरांतील नागरिकांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.पुणे आणि कोल्हापूरचा मध्यबिंदू असलेले सातारा शहर पुणे-बंगळूर महामार्गावर असतानासुद्धा सर्वच पातळ्यांवरील विकासात इतर शहरांच्या तुलनेत नेहमी मागे पडले आहे. शिक्षण आणि नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने येथील तरुण मोठ्या संख्येने पुण्या-मुंबईला स्थलांतरित होत असून, ही धूप रोखण्यासाठी कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत. दर आठवड्याला ये-जा करणाऱ्या तरुणांच्या वाढत्या संख्येमुळे सातारा-स्वारगेट विनाथांबा बससेवा अपुरीच पडते आहे. अशा वातावरणात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय साताऱ्याला उभारण्याच्या निर्णयामुळे सातारकरांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिन्यापूर्वीच सातारा जिल्ह्याचा दौरा केला. माण तालुक्यातील जलयुक्त शिवार योजनेची पाहणी केल्यानंतर साताऱ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी वैद्यकीय महाविद्यालय होणारच, असे ठासून सांगितले होते. त्यासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या ताब्यात असलेली जमीन संपादन करण्याची प्रक्रिया जलद पूर्ण केली जाईल, असे आश्वासनही दिले होते. एक मोठे महाविद्यालय सुरू झाले की त्या पाठोपाठ अनेक अनुषांगिक बाबी आपोआप येतात. परिसरातील हुशार युवकांना घराजवळ कमी शुल्कात वैद्यकीय शिक्षणाची सुविधा उपलब्ध होते.
तथापि, वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीचा निर्णय पुन्हा एकदा अधांतरी राहिल्यामुळे सातारकरांना वर्षानुवर्षे येत असलेला अनुभवच पुन्हा आला आहे.
विकासाच्या बाबतीत ‘सवतीचा लेक’ ठरलेल्या साताऱ्याला निसर्गाने भरभरून दान दिले असले, तरी पर्यटनातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले गेले नाहीत. हायवेलगत असलेल्या सातारा औद्योगिक वसाहतीत बड्या उद्योगधंद्यांची पावले पडली नाहीत. काही मोठे कारखाने आधी साताऱ्यात प्रस्तावित असताना नंतर इतरत्र हलविले गेले.
त्यामुळे नव्या पिढीच्या सातारकरांचे स्थलांतर होत असतानाच वैद्यकीय महाविद्यालय रखडणार, या
जाणिवेने सातारकर अस्वस्थ आहेत. (प्रतिनिधी)


आयुर्वेदिक महाविद्यालयही उपेक्षित
आयुर्वेदाच्या प्रदीर्घ परंपरेचा आदर करण्यासाठी आयुर्वेद विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा राज्य शासनाने केली आहे. साताऱ्यातील आर्यांग्ल वैद्यकशास्त्र महाविद्यालय हे आयुर्वेदाचे शिक्षण देणारे जुने महाविद्यालय मात्र शासकीय सुविधांपासून वंचितच आहे. आयुर्वेदातील धुरिणांनी स्थापन आणि जतन केलेल्या या महाविद्यालयाला सध्या आलेली अवकळा पाहून सातारकर व्यथित होत आहेत. आयुर्वेदाचा आदर असणाऱ्यांनी जिल्ह्याच्या दुर्गम पश्चिम भागात वनौषधींना असलेले पोषक वातावरण, अर्कशाळेसारखी औषधनिर्मिती संस्था आणि आर्यांग्ल महाविद्यालय या घटकांचा एकत्रित विचार करणे आवश्यक आहे, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

पालकमंत्र्यांचा
भ्रमणध्वनी बंद
सातारा येथील नियोजित वैद्यकीय महाविद्यालय रद्द करण्याचा निर्णय ‘मोदी सरकार’ने घेतल्यामुळे सर्व सामान्यांमधून तिखट प्रतिक्रिया उमटत होती. या संदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा भ्रमणध्वनी रविवारी दिवसभर बंद असल्याचा संदेश येत होता. या निर्णयाबाबत पालकमंत्री शिवतारे यांची प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.


सातारा येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबत आघाडी सरकारने मंजुरी दिली होती. हे महाविद्यालय केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने रद्द केला असल्यास तो चुकीचा आहे. यासंदर्भात आपण पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे. सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी पालकमंत्री विजय शिवतारे यांनीही पुढाकार घ्यायला हवा. सातारा येथील वैद्यकीय महाविद्यालय रद्द झाल्यामुळे सातारा जिल्ह्याच्या विकासावर विपरित परिणाम होणार आहे. हे महाविद्यालय व्हावेच, यासाठी आपण आग्रही राहणार आहे.
- आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले

Web Title: Satara becomes the 'Lake of Sawati'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.