सातारा : बिचुुकलेच्या जवानाने वाचविले पाच अधिकाऱ्यांचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 01:06 PM2018-06-08T13:06:49+5:302018-06-08T13:06:49+5:30
देशाला अभिमान वाटावा, अशी धाडसी कामगिरी कोरेगाव तालुक्यातील बिचुकले येथे राहणाऱ्या व केंद्रीय राखीव पोलीस दलात कार्यरत असलेल्या विशाल गोरख पवार या जवानाने केली आहे. श्रीनगरमधील नव्हाटा या ठिकाणी अतिरेकी संघटनांना मदत करणाऱ्या जमावाने विशाल पवार यांच्या गाडीवर दगडफेक केली.
वाठार स्टेशन (सातारा) : देशाला अभिमान वाटावा, अशी धाडसी कामगिरी कोरेगाव तालुक्यातील बिचुकले येथे राहणाऱ्या व केंद्रीय राखीव पोलीस दलात कार्यरत असलेल्या विशाल गोरख पवार या जवानाने केली आहे.
श्रीनगरमधील नव्हाटा या ठिकाणी अतिरेकी संघटनांना मदत करणाऱ्या जमावाने विशाल पवार यांच्या गाडीवर दगडफेक केली. यावेळी प्रसंगावधान दाखवून गाडीत बसलेल्या आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यासह एकूण पाचजणांची जवान विशाल पवार यांनी सुखरूप सुटका केली.
विशाल पवार हे केंद्रीय राखीव पोलीस दलात चालक पदावर कार्यरत आहेत. सध्या ते श्रीनगर या संवेदनशील ठिकाणी कर्तव्य बजावत आहेत. दि. २ जून रोजी विशाल पवार हे आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह एमआर गंज या ठिकाणाहून नव्हाटा शहरातून कॅम्पकडे निघाले होते. या शहरातील एका चौकात येताच अतिरेक्यांना मदत करणाऱ्या सुमारे पाचशेहून अधिक नागरिकांच्या जमावाने त्यांच्या गाडीवर दगडाचा मारा सुरू केला.
विशाल पवार यांनी प्रसंगावधान दाखवत आपली गाडी हळूहळू बाहेर काढली. मात्र ही गाडी खाँजा बाजार चौकात येताच गर्दी अजूनच वाढली. यामुळे या गर्दीतून वाट काढण्यासाठी त्यांना दोन मिनिटे गाडी उभी करावी लागली. यावेळी जमावातील काही लोकांनी या
गाडीचा दरवाजा उघडला आणि अधिकऱ्यांना गाडीतून बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला.
परंतु गाडीत पाठीमागे बसलेल्या जवानाने दरवाजा बंद करण्यात यश मिळवले. यावेळी विशाल पवार यांचे या सर्व बाबींवर लक्ष होते. त्यामुळे ते आपली गाडी हळूहळू पुढे घेत होते. अखेर मोठ्या धाडसाने त्यांनी आपली गाडी जमावातून बाहेर काढून आपल्या सहकाऱ्यांना कॅम्पपर्यंत सुखरूप पोहोचविले. त्यांच्या या कामगिरीचे सातारा जिल्ह्यातून कौतुक होत आहे.