सातारा :शॉर्टसर्किटनं लागलेल्या आगीत माडी खाक, गॅस सिलिंडरचाही स्फोट : पिंपोडे बुद्रुक ग्रामस्थांची आग विझविण्यासाठी धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 12:13 PM2017-12-22T12:13:55+5:302017-12-22T12:21:19+5:30
कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक येथील बाजारपेठेत असलेल्या एका जुन्या घराला शॉर्टसर्किटमुळे शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास आग लागली. आगीत गॅस सिलिंडरचाही स्फोट झाला. या घटनेत मोठे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे. सुमारे दोन तासांच्या प्रयत्नांनंतरही आग विझविण्याचे काम सुरू आहे. या आगीची झळ आजूबाजूच्या घरांनाही पोहोचली आहे.
पिंपोडे बुद्रुक (सातारा) : कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक येथील बाजारपेठेत असलेल्या एका जुन्या घराला शॉर्टसर्किटमुळे शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास आग लागली. आगीत गॅस सिलिंडरचाही स्फोट झाला. या घटनेत मोठे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे.
याबाबत माहिती अशी की, पिंपोडे बुद्रुक येथील बाजार पेठेत विक्रम महाजन यांचे माडीचे जुने घर आहे. घरात काहीजण असतानाच अचानक शॉर्टसर्किटमुळे आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच घरातील मंडळी बाहेर धावत आली.
आग विझविण्यासाठी ग्रामस्थ व तरुणांनी धाव घेतली. भुर्इंज येथील किसन वीर सहकारी साखर कारखान्याचा अग्निशमन बंब बोलाविला. मात्र तो येण्यास उशीर झाला.
दरम्यानच्या काळात ही आग वाढत गेल्याने स्वयंपाक घरातील सिलिंडरचा स्फोट झाला. यामुळे आगीने रुद्र रूप धारण केले. सुमारे दोन तासांच्या प्रयत्नांनंतरही आग विझविण्याचे काम सुरू आहे. या आगीची झळ आजूबाजूच्या घरांनाही पोहोचली आहे.