सातारा : वर्ये गावच्या हद्दीत होणार ब्रेक टेस्ट ट्रॅक, जागा निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 02:39 PM2018-07-21T14:39:36+5:302018-07-21T14:46:11+5:30
मोठ्या वाहनांच्या आरटीओ पासिंगसाठी आवश्यक असणारा ब्रेक टेस्ट ट्रॅक पुणे-बेंगलोर महामार्गावर वर्ये (ता. सातारा) गावाच्या हद्दीत करण्यात येणार आहे. मात्र, यासाठी अडीच हेक्टर जागा उपलब्ध होणे आवश्यक असून जागा मागणीचा प्रस्ताव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विभागीय आयुक्तांकडे सादर केला.
सातारा : मोठ्या वाहनांच्या आरटीओ पासिंगसाठी आवश्यक असणारा ब्रेक टेस्ट ट्रॅक पुणे-बेंगलोर महामार्गावर वर्ये (ता. सातारा) गावाच्या हद्दीत करण्यात येणार आहे. मात्र, यासाठी अडीच हेक्टर जागा उपलब्ध होणे आवश्यक
असून जागा मागणीचा प्रस्ताव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विभागीय आयुक्तांकडे सादर केला.
विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर या प्रस्तावावर जितक्या लवकर निर्णय घेतील, तितक्या लवकर जिल्हावासीयांसाठी महत्त्वाचा असणारा वाहन पासिंगचा प्रश्न मार्गी लागणार आहे. लोकमतने या ब्रेक टेस्ट ट्रॅकसाठी पाठपुरावा सुरू ठेवला आहे. हा ट्रॅक साताऱ्यात नसल्याने वाहनांचे पासिंग कऱ्हाड येथील उपप्रादेशिक कार्यालयामार्फत करावे लागत आहे.
यासाठी डिझेल, टोल यासाठी पैसे खर्च करून वाहनधारकांना हेलपाटे घालावे लागत आहेत. एका दिवसात काम
झाले नाही तर आणखी एखादा दिवस हेलपाटा मारावा लागत असल्याने नवीन वाहन घेणाऱ्याच्या खिशाला चाट बसत आहे. याबाबत लोकमतने पाठपुरावा केला. या वृत्तानंतर लोकप्रतिनिधींकडूनही याला प्रतिसाद देत शासन दरबारी गाºहाणे मांडले.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार वर्ये, ता. सातारा येथील गायरानाची अडीच हेक्टर जागा निश्चित करण्यात आली. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या सूचनेनंतर ब्रेक टेस्ट
ट्रॅकसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. वर्ये ग्रामपंचायतीने तसा ठरावही केला आहे. एक हेक्टर जागा उपलब्ध करून देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असतात.
मात्र ही जागा त्यापेक्षा जास्त असल्याने त्यासाठी विभागीय आयुक्तांची परवानगी घेणे आवश्यक आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने तसा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर केला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास सातारकरांचा मोठा प्रश्न सुटणार आहे.
ब्रेक टेस्ट ट्रॅकचे डिझाईन तयार करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम
खात्याच्या अधिकाऱ्यांची बोलणे झाले आहे. जागा मिळाल्यास कुठल्याही क्षणी
हे काम सुरू करता येईल.
- संजय धायगुडे,
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
लोकमतने जिल्हावासीयांच्या एका महत्त्वाच्या प्रश्नाला वाचा फोडली. आता ही जागा लवकरात लवकर मिळणे गरजेचे आहे. आम्ही जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांच्याकडे याबाबत पाठपुरावा करणार आहे, येत्या काही दिवसांत हा प्रश्न मिटेल, असे निश्चितपणे वाटते.
- चिन्मय कुलकर्णी,
अध्यक्ष, संकल्प इंजिनिअरिंग व सामाजिक संघटना