Satara Bus Accident : आंबेनळी घाटातील वाहतूक भोरमार्गे वळवली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2018 04:08 PM2018-07-29T16:08:26+5:302018-07-29T16:16:22+5:30
एसटीचा निर्णय : शोधकार्यातील अडथळे टाळण्यासाठी महाबळेश्वर आगाराचे पाऊल
सातारा : आंबेनळी घाटातील खोल दरीत बस पडल्याचा फोन आला अन् राज्य परिवहन महामंडळाच्या महाबळेश्वर आगारातील अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी धावले. मदत अन् शोधकार्य सुरू झाले. यामध्ये वाहतुकीचा अडथळा येऊ नये म्हणून पोलिसांनी एसटीच्या फे-या बंद करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार फे-या भोरमार्गे वळविण्यात आल्या.
कोकण अन् पश्चिम महाराष्ट्राला जोडण्यासाठी आंबेनळी घाट जवळचा समजला जातो. परंतु आंबेनळी घाटातील अवघड व तीव्र वळणं वाहनचालकांच्या काळजाचा थरकाप उडवितात. या मार्गावरून एसटीच्या दिवसभरात सरासरी पन्नासच्या फे-या होतात. त्यात मुंबई तसेच रायगडच्या अनेक भागांतून अक्कलकोट, महाबळेश्वर, सातारा, सांगलीकडे जाणा-या एसटी बसेसचा समावेश आहे. तितक्याच खासगी प्रवासी वाहतूकही सुरू असते.
या घाटात शनिवारी (28 जुलै) सकाळी अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच प्रशासकीय यंत्रणा मदतीसाठी धावून गेली. क्रेन मागविण्यात आल्या. त्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद करावा लागला. मदत अन् शोधकार्यात अडथळे येऊ नये, यासाठी आंबेनळी घाटातून होणारी दोन्ही बाजूंची वाहतूक बंद करण्याच्या सूचना पोलिसांनी केल्या.
महाबळेश्वरचे आगार व्यवस्थापक नामदेव पतंगे यांनी लागलीच सर्व गाड्या भोरमार्गे वळवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कोणत्याच प्रवाशांची गैरसोय झाली नाही. या गाड्या महाबळेश्वरमधून भोरमार्गे पोलादपूर अन् पुढे नियोजित प्रवास असा मार्ग करण्यात आला. त्यासंदर्भात महाबळेश्वर बसस्थानकातच चालक-वाहकांना सूचना करण्यात येत होत्या. याखेरीज खासगी प्रवासी व मालवाहतूकही बंद होती.
सर्व मृतदेह रविवारी दुपारी दोन वाजता दरीतून वर काढण्यात आले. पोलिसांकडून सूचना मिळताच या मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात येतील, अशी माहिती आगार व्यवस्थापक नामदेव पतंगे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.