Satara Bus Accident : अखेर पाच महिन्यांनी गुन्हा दाखल, मृत बस चालकावर निष्काळजीपणाचा ठपका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2019 01:23 PM2019-01-05T13:23:51+5:302019-01-05T14:05:23+5:30
Satara Bus Accident : पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात झालेल्या भीषण बस अपघातप्रकरणी अखेर पाच महिन्यांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दापोली : पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात झालेल्या भीषण बस अपघातप्रकरणी अखेर पाच महिन्यांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 30 जणांचा मृत्यू झालेल्या या भीषण दुर्घटनेप्रकरणी मृत बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बस चालक प्रशांत भांबेडवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे.
(आंबेनळी दरीत कोसळलेली बस तब्बल ७ तासानंतर काढली बाहेर)
बसचालक प्रशांत भांबेड हे त्यांच्या ताब्यातील बस (क्र. एम एच ०८ ई ९०८७) दापोली ते महाबळेश्वरदरम्यान घेऊन जात होते. यादरम्यान त्यांनी निष्काळजीपणाने आणि रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन वाहन चालवल्याचा ठपका भांबेड यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलादपूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
(आंबेनळी अपघात : प्रकाश देसाईंच्या नार्को टेस्ट करा, मृतांच्या नातेवाईकांची मागणी)
काय आहे नेमकी घटना?
दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचारी 28 जुलै 2018 रोजी पावसाळी सहलीनिमित्त महाबळेश्वरला निघाले होते. यादरम्यान आंबेनळी घाटात बस कोसळून 31 पैकी 30 जण जागीच मृत्यू झाला होता. या सहलीसाठी त्यांनी विद्यापीठाची बस भाड्याने घेतली होती. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही बस महाबळेश्वरच्या दिशेने निघाली होती. यादरम्यान सकाळी 10.30 वाजण्याच्यास सुमारास ही बस आंबेनळी घाटात कोसळली आणि भीषण दुर्घटना घडली. या अपघातातून प्रकाश सावंत-देसाई हे एकमेव बचावले होते.