अंतरिक्ष अन् दऱ्यांच्या अस्तित्वातून आलं सातारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:33 AM2021-01-17T04:33:38+5:302021-01-17T04:33:38+5:30
सातारा शहर इतिहासात मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून प्रसिद्ध होते. १७०८ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू छत्रपती शाहू महाराज यांचा ...
सातारा शहर इतिहासात मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून प्रसिद्ध होते. १७०८ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू छत्रपती शाहू महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा सातारा शहरात झाला. त्यानंतर मराठा राज्याच्या अखेरपर्यंत सातारा शहर मराठ्यांची राजधानी होते. सातारा शहराची स्थापना संभाजीचे पुत्र छत्रपती थोरले शाहू महाराज यांनी केली. औरंगजेबाच्या कैदेतून सुटून आल्यावर शाहू महाराजांनी सातारच्या किल्ल्यावर अर्थात अजिंक्यताऱ्यावर राज्याभिषेक करून घेतला. तिथूनच त्यांनी राज्यकारभाराची सूत्रे हलवण्यास सुरुवात केली. विखुरलेले एक एक मराठा सरदार एकत्र करून त्यांच्यात स्वराज्याची ऊर्मी नव्याने जागृत करत शाहू महाराजांनी मराठा स्वराज्याला मराठा साम्राज्याचे स्वरूप देण्यास सुरुवात केली. मराठा साम्राज्याचा चहूबाजूला जसाजसा विस्तार होऊ लागला तसतसा सातारच्या किल्ल्याचा परिसर प्रशासनाच्या दृष्टीने कमी पडू लागला व त्यातूनच सातारा शहराच्या स्थापनेची कल्पना पुढे आली आणि शहराची मुहूर्तमेढ रोवत शाहू महाराजांनी मराठा स्वराज्याच्या ७० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच स्वराज्याची राजधानी डोंगरावरून जमिनीवर आणली.
सातारा शहराची अर्थात शाहूनगरीची रचना व त्यातील भागांची नवे शाहू महाराजांच्या आमदनीची आठवण करून देतात. शाहूनगरीची स्थापना इ.स. १७२१ च्या सुमारास झाली. शाहू महाराजांच्या दिनांक २८ मार्च १७२१ च्या पत्रात तातडीने वाडा बांधल्याचा उल्लेख आहे. शाहू महाराजांच्या व पेशव्यांच्या ज्या भेटी होत त्या रोजनिशीत नोंदल्या आहेत, त्यावरून शहर रचनेच्या कालावधीचा अंदाज लागतो. महाराष्ट्रातील पहिले नियोजनबद्ध शहर वसवताना शाहू महाराजांनी तख्ताचा वाडा, रंगमहाल, पीलखाना, अदालतवाडा, बेगम मस्जिद अशा अनेक भव्यदिव्य इमारतींची उभारणी केली.
छत्रपती थोरले प्रतापसिंह महाराज यांनी सातारा शहराची मुख्य वस्ती, विविध पेठाही वसविल्या. रविवार पेठ, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, गुरुवार पेठ, शुक्रवार पेठ, शनिवार पेठ या आठवड्यांच्या वारांच्या नावाने पेठा वसविल्यानंतरही काही भाग नावाशिवाय होता. पण तिथली खासियत किंवा परिसरात राहणाऱ्या, उत्तम कार्य करणाऱ्या नावांनी पुढं काही पेठा आल्या. यात गडकर आळी, माची पेठ, राजसपुरा पेठ, मल्हार पेठ, मेट, चिमणपुरा पेठ, व्यंकटपुरा पेठ, यादोगोपाळ पेठ, प्रतापगंज पेठ, रामाचा गोट, केसरकर पेठ, रघुनाथपुरा पेठ, बसप्पा पेठ, खण आळी, ढोर गल्ली या नावांचा समावेश आहे.
कोट
महाराष्ट्रातील पहिले नियोजनबद्ध शहर म्हणून साताऱ्याची ओळख आहे. या ऐतिहासिक शहराचे प्रथम नागरिक म्हणून काम करताना निश्चितच अभिमान वाटतो. शहराच्या वैभवात भर पडेल आणि इथलं ऐतिहासिक महत्त्व अबाधित राहील, असेच काम करण्याचा प्रयत्न कायम आहे.
- माधवी कदम, नगराध्यक्षा