Satara: सीसीटीव्हीतील रिक्षा ठरली चोरटे शोधण्यासाठी उपयुक्त, चालकासह दोन महिलांना अटक
By नितीन काळेल | Published: May 26, 2023 07:23 PM2023-05-26T19:23:49+5:302023-05-26T19:24:35+5:30
Satara Crime News: सातारा शहरातील मंगळवार पेठेत माजी नगरसेवकाच्या बंगल्याच्या साईटवरुन लाेखंडी साहित्याची चोरी करणाऱ्या तिघांना शाहुपुरी पोलिसांनी गजाआड केले.
- नितीन काळेल
सातारा - शहरातील मंगळवार पेठेत माजी नगरसेवकाच्या बंगल्याच्या साईटवरुन लाेखंडी साहित्याची चोरी करणाऱ्या तिघांना शाहुपुरी पोलिसांनी गजाआड केले. यामध्ये रिक्षाचालकासह दोन महिलांचा समावेश आहे. त्यांच्याकडून १ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पोलिसांना सीसीटीव्हीत चोरीसाठी रिक्षाचा वापर केल्याचे दिसून आले होते. त्यावरुन तपास करुन चोरटे शोधले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सातारा शहरातील मंगळवार पेठेतील ढोणे कॉलनीत माजी नगरसेवक रविंद्र ढोणे यांच्या बंगल्याचे बांधकाम सुरू आहे. बांधकामाच्या साईटवरील लोखंडी साहित्याची अनोळखी महिलांनी चोरी करुन ते रिक्षातून नेल्याची तक्रार पाच दिवसांपूर्वी शाहुपूरी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तर पोलिस अधीक्षक समीर शेख आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक बापू बांगर यांनी गुन्हा उघडकिस आणणण्याची सूचना शाहुपुरीचे पोलिस निरीक्षक संजय पतंगे यांना केली होती.
निरीक्षक पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक तपास करत होते. या पथकाने घटनास्थळी भेट देऊन त्याठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले होते. यातून चोरीसाठी वापरलेल्या रिक्षाबाबत माहिती प्राप्त केली होती. याचवेळी शाहुपुरी पोलीस ठाण्यातील हवालदार तुषार डमकले हे दि. २५ मे रोजी रात्रपाळी कर्तव्यावर असताना पहाटेच्या सुमारास त्यांना एका रिक्षामध्ये दोन महिला संशयितरित्या फिरताना दिसून आल्या. त्यामुळे त्यांनी दोन संशयित महिला व रिक्षाचालकाला पोलिस ठाण्यात आणून कौशल्याने विचारपुस करुन तपास केला. त्यावेळी त्यांनी ढोणे कॉलनीतील बांधकामावरील लोखंडी साहित्याची चोरी केल्याचे कबुली दिली. बजरंग यशवंत काळे (वय ३३ रा. काळेवस्ती कोंडवे, ता. सातारा) या रिक्षाचालकासह सोमावती विजय घाडगे (वय ३०आणि पुनम मुकेश जाधव (वय २५, दोघीही रा. गोसावीवस्ती सैदापूर) सातारा) यांना अटक केली. त्यांच्याकडून लोखंडी रिंगा, लोखंडी बार तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली रिक्षा व मोबाईल असा एेकूण १ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे हवालदार हसन तडवी, लैलेश फडतरे, तुषार डमकले, अमीत माने, स्वप्निल कुंभार, ओंकार यादव, सचिन पवार, स्वप्निल सावंत, स्वप्निल पवार, चालक शशिकांत नलवडे यांनी कारवाई केली.