सातारा : रयतेला शहाणं करणाऱ्या संस्थेचा शतक महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 04:00 PM2018-10-05T16:00:21+5:302018-10-05T16:02:05+5:30
तळागाळातील मुलांसाठी शिक्षणाची कवाडं खुली करून देण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ४ आॅक्टोबर १९१९ रोजी विजया दशमीला सुरू केलेली रयत शिक्षण संस्था शताब्दी महोत्सव साजरा करत आहे. या संस्थेतून तब्बल साडेचार लाख विद्यार्थी ज्ञान घेत आहेत.
सातारा : तळागाळातील मुलांसाठी शिक्षणाची कवाडं खुली करून देण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ४ आॅक्टोबर १९१९ रोजी विजया दशमीला सुरू केलेली रयत शिक्षण संस्था शताब्दी महोत्सव साजरा करत आहे. या संस्थेतून तब्बल साडेचार लाख विद्यार्थी ज्ञान घेत आहेत.
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड तालुक्यातील काले येथे केली. १९१९ मध्ये अण्णांनी लावलेल्या शिक्षणरूपी रोपट्याचा वटवृक्ष झाला आहे.
महाराष्ट्रातील १५ जिल्हे अन् कर्नाटकातील एका जिल्ह्यातून अशी ४२ महाविद्यालये, ४३८ हायस्कूल, ९१ वसतिगृहे, १६० उच्च माध्यमिक विद्यालये, १७ शेती महाविद्यालये, पाच तंत्र विद्यालये, पाच इंग्रजी माध्यमाच्या शाळा, आठ अध्यापक महाविद्यालये, ४५ प्राथमिक व पूर्व महाविद्यालये, आठ आश्रमशाळा तर ५८ आयटीआय अशा ७३७ शाखा तयार झाल्या आहेत.
त्यातून साडेचार लाख विद्यार्थ्यांना ज्ञानदान केले जाते. या ठिकाणी १३, ५५३ कर्मचारी कार्यरत आहेत. भव्यदिव्य विस्तार झालेल्या रयत शिक्षण संस्था ही आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था समजली जाते. साताºयातील यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयास नुकताच स्वायत्ता मिळाली आहे. बोधी वृक्षाखाली गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झाले. त्यामुळे कर्मवीर भाऊराव पाटील यांनीही रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह म्हणून वटवृक्षाची निवड केली.
स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद
स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे घोषवाक्य घेऊन सुरू झालेल्या रयत शिक्षण संस्थेत कमवा आणि शिकामधून हजारो विद्यार्थी धडे घेत आहेत. रयत शिक्षण संस्थेचा अनेक विद्यापीठांनी आदर्श घेतला आहे.
शतकाच्या वाटचालीत रयत परिवार मोठा झाला आहे. भविष्यात चिकित्सक व संशोधन वृत्ती विद्यार्थ्यांमध्ये वृद्धिंगत होण्यासाठी रयत प्रयत्नशील राहणार आहे. यासाठी तंत्रस्नेही शिक्षण देण्यासाठी शिक्षकांना आवश्यक प्रशिक्षणही देण्यात येईल.
- अनिल पाटील,
चेअरमन, रयत शिक्षण संस्था