सातारा : जिल्ह्यात आज विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 02:16 PM2018-04-05T14:16:04+5:302018-04-05T14:17:35+5:30
सातारा जिल्ह्यात शुक्रवार (दि. ६) व शनिवार (दि. ७) असा सलग दोन दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. उन्हाळ्याच्या झळा असह्य होत असताना पावसाच्या शक्यतेमुळे गारवा निर्माण होणार आहे.
सातारा : सातारा जिल्ह्यात शुक्रवार (दि. ६) व शनिवार (दि. ७) असा सलग दोन दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. उन्हाळ्याच्या झळा असह्य होत असताना पावसाच्या शक्यतेमुळे गारवा निर्माण होणार आहे.
साताऱ्यासह कोल्हापूर, सांगली, सोलापूर व पुणे या जिल्ह्यांतही गारांसह पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यान, जिल्ह्यात ज्वारी, गहू, हरभरा या हंगामी पिकांची काढणी व इतर सर्व कामे जवळपास पूर्णत्वाला गेली आहेत.
शेतकऱ्यांकडून चाऱ्याच्या गंजी लावण्याची कामे ठिकठिकाणी सुरू आहेत. बहुतांश गावांत यात्रा सुरू आहेत. या पावसामुळे चाऱ्यांच्या गंजी भिजण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना सावधगिरी बाळगून चाऱ्यांच्या गंजी झाकण्याची गरज भासणार आहे.
गारा व विजा कोसण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे. ज्या गावांत यात्रा सुरू आहेत, तिथेही पळापळ होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाची चिन्हे निर्माण झाली आहे.
दरम्यान, जलयुक्त शिवार व पाणी फाउंडेशन तसेच लोकसहभागातून ज्या गावांत पाणी साठवणूक तलावांची निर्मिती करण्यात आली आहे, तिथे पाऊस झाल्यास त्याचा फायदाच होणार आहे.