सातारा : अधिकाऱ्यांच्या निवासस्थानामध्ये गिरवणार मुले शिक्षणाचे धडे, पोलिसांमध्ये कुतूहल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 03:14 PM2018-03-07T15:14:29+5:302018-03-07T15:14:29+5:30
गेल्या पन्नास वर्षांपासून अधिकाऱ्यांचे वास्तव्य असलेल्या पोलीस मुख्यालयासमोरील इमारतीमध्ये आता पोलिसांची मुले शिक्षणाचे धडे गिरवणार आहेत. या इमारतीमध्ये चौथी ते पाचवी इंग्लिश मीडियम स्कूल सुरू होत असून, यामध्ये फक्त पोलिसांच्या मुलांनाच प्रवेश दिला जाणार आहे.
सातारा : गेल्या पन्नास वर्षांपासून अधिकाऱ्यांचे वास्तव्य असलेल्या पोलीस मुख्यालयासमोरील इमारतीमध्ये आता पोलिसांची मुले शिक्षणाचे धडे गिरवणार आहेत. या इमारतीमध्ये चौथी ते पाचवी इंग्लिश मीडियम स्कूल सुरू होत असून, यामध्ये फक्त पोलिसांच्या मुलांनाच प्रवेश दिला जाणार आहे.
पोलीस मुख्यालयासमोर ब्रिटीशकालीन इमारत आहे. या इमारतीमध्ये इग्रजांच्या काळात राखीव पोलीस अधिकारी वास्तव्य करत असत. ही परंपरा पुढे भारत स्वतंत्र झाल्यानंतरही सुरूच राहिली. ती आजतागायत होती. पोलीस मुख्यालयासमोरून जाता-येता ही टुमदार इमारत सगळ्यांचे लक्ष वेधून घेते.
या इमारतीमध्ये वास्तव करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांमध्ये चढाओढ असायची. मात्र, कालांतराने अधिकाऱ्यांना शासकीय वसाहती वास्तव्यासाठी उपलब्ध झाल्याने ही ब्रिटीशकालीन इमारत ओस पडत चालली होती. पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी या पडीक इमारतीचा चांगला उपयोग करण्याचा निर्णय घेतला.
या इमारतीमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलासांठी शाळा सुरू करण्याचा विचारविनमय झाल्यानंतर त्याची तातडीने अंमलबजावणी सुरू झाली. सध्या या इमारतीला रंगरंगोटीचे काम सुरू आहे. अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाचे रुपडे शाळेमध्ये रुपांतरीत करण्यासाठी रात्रंदिवस कर्मचारी या इमारतीमध्ये सध्या काम करत आहेत.
मुलांना बसण्यासाठी व्हरांडा, पाण्याची सोय, तसेच खेळण्यासाठी अंगण अशाप्रकारच्या सुविधा तयार केल्या जात आहेत. खाकी वर्दी आणि अधिकाऱ्यांच्या कामाची पद्धत मुलांनी शाळेत येता-जाता जरी पाहिली तरी त्यांना यातून आपणही मोठे अधिकारी व्हावे, ही प्रेरणा त्यांच्यामध्ये जागृत होईल, हाच हेतू डोळ्यासमोर ठेवून अधिकाऱ्यांच्या इमारतीमध्ये शाळा सुरू करण्यात आल्याचे एका अधिकाऱ्यांने लोकमतशी बोलताना सांगितले.