सातारा शहराचा पारा ३० अंशांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:24 AM2021-07-12T04:24:44+5:302021-07-12T04:24:44+5:30

सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा एकदा उघडीप दिली आहे. त्यामुळे दिवसभर कडक ऊन पडल्याने ...

Satara city mercury at 30 degrees | सातारा शहराचा पारा ३० अंशांवर

सातारा शहराचा पारा ३० अंशांवर

googlenewsNext

सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा एकदा उघडीप दिली आहे. त्यामुळे दिवसभर कडक ऊन पडल्याने तापमानातही वाढ झाली. हवामान विभागाने रविवारी सातारा शहराचे कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस तर किमान तापमान २२.७ अंश सेल्सिअस इतके नोंदविले आहे. वातावरणात सतत बदल होत असून, सायंकाळनंतर हवेत गारव्याचे प्रमाण वाढत आहे. महाबळेश्वर तालुक्यात मात्र पाऊस व थंडीची तीव्रता कायम आहे. येथील कमाल तापमान २२.६ अंश तर किमान तापमान १७.८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे.

धोकादायक फांद्यांचा अडथळा हटवला

सातारा : वीज वाहिन्यांना अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या धोकादायक फांद्या हटविण्याची मोहीम सातारा पालिका व महावितरण कंपनीने हाती घेतली आहे. सातारा शहरात गेल्या काही दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. शहरासह उपनगरात पाऊस व वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या वीज वाहिन्यांवर पडून विद्युत पुरवठा सातत्याने खंडित होत आहे. तसेच काही फांद्यांमुळे वीज वाहिन्यांना धोका निर्माण झाला आहे. अशा धोकादायक फांद्या पालिका व वीज कंपनीकडून हटवल्या जात आहेत.

केळघर घाटात तारेवरची कसरत

मेढा : मेढा - महाबळेश्वर मार्गावर असलेल्या केळघर घाटातून प्रवास करणे सध्या धोक्याचे ठरू लागले आहे. घाटात रुंदीकरणाचे काम सुरू असून, मातीमुळे ठिकठिकाणी चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. आधीच धोकादायक वळणे, त्याच सर्वत्र चिखल पसरल्याने वाहनचालकांना घाटातून प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. घाटात दरड कोसळण्याच्या शक्यतेने आता वाहनचालकांनी रात्रीचा प्रवासही बंद केला आहे. प्रशासनाने रुंदीकरणाचे काम लवकरात लवकर मार्गी लावावे तसेच घाटात धोकादायक ठिकाणी दिशादर्शक फलक बसवावेत, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे.

भटक्या श्वानांची नागरिकांमध्ये भीती

सातारा : शहरात भटक्या श्वानांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. हे श्वान पादचाऱ्यांसह नागरिकांच्या अंगावर धावून येत असल्याने नागरिकांसह महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पालिकेने भटक्या श्वानांना पकडून सोनगावजवळील कोंडवाड्यात सोडण्याचा ठराव सभेत मंजूर केला आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून या ठरावावर अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे भटक्या श्वानांचा विषय गंभीर होऊ लागला आहे.

Web Title: Satara city mercury at 30 degrees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.